१५६ आरोपींकडून २३० वाहने हस्तगत, ठाणे पोलिसांची कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 06:12 AM2018-11-07T06:12:52+5:302018-11-07T06:13:01+5:30
वाहन चोरांच्या गुन्हे कार्यप्रणालीची माहिती काढून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वेगवेगळ्या पथकांनी गेल्या दोन महिन्यांमध्ये वाहनचोरीचे २०७ गुन्हे उघड केले.
ठाणे - वाहन चोरांच्या गुन्हे कार्यप्रणालीची माहिती काढून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वेगवेगळ्या पथकांनी गेल्या दोन महिन्यांमध्ये वाहनचोरीचे २०७ गुन्हे उघड केले. यात १५६ आरोपींना अटक करून तब्बल २३० वाहने हस्तगत केल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रविण पवार यांनी मंगळवारी आयुक्तालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर घेतलेल्या मासिक गुन्हे आढाव्यात वाढत्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्याचे तसेच हे गुन्हे उघड करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सर्व पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेतील मालमत्ता शोध पथक कक्ष, खंडणीविरोधी पथक आणि गुन्हे युनिट क्रमांक एक ते पाच यांनी मिळून वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी पथके तयार केली. वाहन चोरी तसेच रेकॉर्डवरील आरोपींच्या हालचालींवर पाळत ठेवून काही ठिकाणी आरोपींना रंगेहाथ तर काही ठिकाणी मागोवा काढून त्यांना वाहनांसकट जेरबंद केले.
पोलिसांशी संपर्क साधा
पोलिसांनी हस्तगत केलेल्या वाहनांपैकी २३ दुचाकी तर एका चारचाकीचे मालक मिळाले नाहीत. या वाहनांचे चेसिस आणि इंजिन क्रमांक मेक मॉडेल आदी माहिती सर्व पोलीस ठाण्यात वितरित केली आहे. त्यामुळे ज्यांची वाहने चोरीस गेली आहेत, पण ती मिळाली नसतील, त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा.