पालिका अधिकाऱ्यावरील गोळीबारप्रकरणी ठेकेदारासह साथीदारास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2021 11:11 PM2021-10-05T23:11:47+5:302021-10-06T07:22:28+5:30
पालिकेच्या दोघा कनिष्ठ अभियंत्यांची कसून चौकशी
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेचे कार्यकारी अभियंता दीपक खांबीत यांच्यावर बोरिवली येथे झालेल्या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी पालिकेच्या ठेकेदारासह त्याच्या साथीदारास अटक केली आहे. त्यामुळे अटक आरोपींची संख्या ३ झाली असून तिघांना ९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. तर पालिकेतील दोघा कनिष्ठ अभियंत्यांना ताब्यात घेऊन चौकशी चालवली आहे. खांबीत यांचे वर्चस्व, मनमानी करत असल्याचे तसेच त्यांच्यामुळे पदोन्नती रखडल्याची कारणे हत्येची सुपारी देण्यामागे असल्याची शक्यता पडताळून पाहिली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
२९ सप्टेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित हे त्यांच्या बोरिवली येथील घरी गाडीने जात असताना नॅशनल पार्क येथील कृष्णा इमारतीसमोर दुचाकी वरून पाठलाग करत असलेल्या दोघा हल्लेखोरांनी गाडीवर दोन गोळ्या झाडल्या होत्या. खांबीत सुदैवाने बचावले.
या प्रकरणी कस्तुरबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला होता. पण मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेचे उपायुक्त डॉ महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने अमित सिन्हा ह्या हल्लेखोरास उत्तर प्रदेशच्या भदोई येथून रविवारी ताब्यात घेतले व सोमवारी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले.
मीरा भाईंदर मध्ये राहणाऱ्या अमित सह दुसऱ्या हल्लेखोरास आश्रय देणाऱ्या प्रदीप पाठक याला पोलिसांनी पकडले . अमित व पाठक हे दोघे पालिकेचा ठेकेदार राजू विश्वकर्मा रा. कस्तुरी पार्क, भाईंदर याच्या परिचयातील होते. पोलिसांनी राजू विश्वकर्मा याला ताब्यात घेतले. तिघांना न्यायालयाने ९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान अटक आरोपींच्या चौकशीत खांबीत यांच्या हत्येची सुपारी पालिकेच्या नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता यांनी दिल्याची शक्यता समोर आल्याने त्या अनुषंगाने मंगळवारी दुपारी पालिकेच्या नगररचना विभागातील दोन कनिष्ठ अभियंता यशवंत देशमुख व श्रीकृष्ण मोहिते यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली. मंगळवारी रात्री उशिरा पर्यंत पोलीस त्यांची चौकशी करत होते. दरम्यान अमित सिन्हा सोबत असलेला गोळ्या झाडणारा दुसरा हल्लेखोर सुद्धा पोलिसांच्या हाती लागला असल्याचे सूत्रांनी सांगितले.