भाजप प्रदेशाध्यक्षांच्या नावे फोन करून २५ लाख मागणाऱ्या संशयितास अटक; तीन दिवसांची कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 12:41 PM2020-07-23T12:41:37+5:302020-07-23T17:46:16+5:30
एका रुग्णालयात फोन 25 लाखांची केली होती मागणी, तसेच पैसे न दिल्यास बघून घेण्याची दिली होती धमकी
पिंपरी : भाजप प्रदेशाध्यक्षांच्या नावाने रुग्णालयात फोन करून २५ लाखांची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यास बघून घेऊ, अशी धमकी दिली. याप्रकरणी एका संशयित तरुणाला गुरुवारी (दि. २३) पहाटे निगडीपोलिसांनी पुण्यातून जेरबंद केले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सौरभ संतोष अष्टूल (वय २१, रा. लोहियानगर, गल्ली क्रमांक १, गंजपेठ, पुणे) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी तरुणाने शनिवारी (दि. १८) दुपारी चारच्या सुमारास निगडी येथील एका नामांकित रुग्णालयात फोन केला. भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या ऑफिसमधून मी दादाचा पीए सावंत बोलतोय. कोरोनाच्या महामारीमुळे गरिबांची अवस्था बिकट झाली आहे. त्यांच्या मदतीसाठी ताबडतोब २५ लाख रुपये आमच्या पर्वतीच्या कार्यकर्त्याकडे पाठवून द्या, नाहीतर तुमचे हातपाय तोडून जिवे मारून टाकीन, अशी धमकी आरोपी याने फोनवरून दिली.
याप्रकारानंतर संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधून शहानिशा केली. आपण किंवा आपल्या कार्यालयातून कोणीही असा फोन करून पैसे मागितले नाहीत, असे पाटील यांनी सांगितले. तसेच याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार करण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला. त्यानुसार रुग्णालयातर्फे संबंधित डॉक्टरांनी पोलिसांकडे धाव घेतली.
निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण सोनावणे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कोकाटे, महेंद्र आहेर, पोलीस कर्मचारी किशोर पढेर, मच्छिंद्र घनवट, सतीश ढोले, विलास केकाण, रमेश मावसकर, सोपान बोधवड, आत्मलिंग निंबाळकर, सुनील जाधव, भुपेंद्र चौधरी, विनोद व्होनमाने, विजय बोडके, तुषार गेंगजे, राहुल मिसाळ, तानाजी सोनवणे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
मोबाईल, सिमकार्ड, दुचाकी जप्त
तपासासाठी पोलिसांची दोन पथके तयार करण्यात आली. तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी याची माहिती मिळविली. त्यानुसार पुणे येथे सापळा लावून गुरुवारी पहाटे कारवाई करत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली. गुन्ह्यात वापरलेला एक मोबाईल, एक सिमकार्ड व दुचाकी असा ३५ हजारांचा मुद्देमाल त्याच्याकडून पोलिसांनी जप्त केला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.