खोटी बिले देणाऱ्या व्यापाऱ्यास अटक, ‘राज्य जीएसटी’ची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 05:01 AM2021-02-17T05:01:29+5:302021-02-17T05:01:50+5:30
Crime News :बाबुशा शरणप्पा कसबे असे अटक केलेल्याचे नाव आहे. कसबे यांनी मे. खुशी टेंडर्स वस्तू व सेवाकर कायदा २०१७ अंतर्गत नोंदणी दाखला घेतला.
पुणे : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी करणाऱ्या करदात्यांविरुद्ध कारवाई सुरू केली असून, ११० कोटींपेक्षा अधिक रकमेची खोटी बिले दिल्याप्रकरणी पुण्यातील एका व्यापाऱ्यास राज्य जीएसटी विभागाकडून अटक करण्यात आली आहे. राज्यात आत्तापर्यंत अशा ३ कारवाया करण्यात आल्या आहेत.
बाबुशा शरणप्पा कसबे असे अटक केलेल्याचे नाव आहे. कसबे यांनी मे. खुशी टेंडर्स वस्तू व सेवाकर कायदा २०१७ अंतर्गत नोंदणी दाखला घेतला. या कंपनीच्या माध्यमातून कसबे याने ११० कोटी रकमेची फक्त बिले देऊन १६.८६ कोटींचा आय.टी.सी पुढील खरेदीदारांना पाठवला. त्याचप्रमाणे हा कर भरायला लागू नये यासाठी अनेक बोगस कंपन्यांकडून कोणत्याही वस्तू व सेवेच्या प्रत्यक्ष पुरवठ्याशिवाय दाखवलेल्या बोगस खरेदी बिलातून सुमारे १६.५७ कोटी रकमेचा इनपुट टॅक्स जमा करून घेतल्याचे उघडकीस आले. मुख्य न्यायदंडाधिकारी पुणे यांच्या न्यायालयाने या व्यापाऱ्यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. हे कृत्य अजामीनपात्र असून, वस्तू व सेवाकर कायदा २००७ नुसार ५ वर्षे तुरुंगवास आहे. जीएसटी विभागाच्या वतीने महेश झंवर यांनी कामकाज पाहिले. राज्यकर सहआयुक्त रेश्मा घाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकर उपायुक्त दत्तात्रय आंबेराव, सहायक राज्यकर आयुक्त दत्तात्रय तेलंग यांच्या प्रयत्नातून ही अटक करण्यात आली.
राज्य वस्तू व सेवाकर विभागाला कारवाईदरम्यान बोगस कंपन्यांची माहिती मिळाली आहे. त्यांच्याविरुद्ध आगामी काळात कारवाई केली जाणार आहे.
- दत्तात्रय आंबेराव, राज्यकर उपायुक्त.