ऑनलाईन पध्दतीने परदेशी नागरिकांना गंडा घालणाऱ्या आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 07:05 PM2019-02-01T19:05:11+5:302019-02-01T19:07:13+5:30
परदेशातील नागरिकांना फोन करून त्यांना ऑनलाइन गंडा घालणाऱ्या खराडी भागातील एका कॉलसेंटरवर शुक्रवारी पहाटे छापा टाकण्यात आला.
पुणे : परदेशातील नागरिकांना फोन करून त्यांना ऑनलाइन गंडा घालणाऱ्या खराडी भागातील एका कॉलसेंटरवर शुक्रवारी पहाटे छापा टाकण्यात आला. तेथील चौघांना गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे.
शालीन बिपीन पंचाल, धनंजय बिपीनभाई पंचाल (दोघे, रा. दर्शन अपार्टमेंट, अहमदाबाद, गुजरात), निसर्ग सुभाष पंडीत (रा. सहारा एनक्लेव्ह, विमाननगर, मूळ रा. नवदुर्गा सोसायटी, पाटण, गुजरात), मितेश गोकुल ठक्कर (रा. हरिओम व्हिला, अहमदाबाद, गुजरात), ऐश्वर्य मोहन भारद्वाज (रा. साई कृष्णा अपार्टमेंट, भाईंदर) यांना अटक करण्यात आली. या कारवाईत हार्डडिस्क, लॅपटॉप, हेडफोन, डेबिट कार्ड, मोबाइल तसेच अन्य कागदपत्रे जप्त करण्यात आली. या प्रकरणी खराडी-चंदननगर भागातील एका कॉलसेंटरमधून परदेशातील नागरिकांची ऑनलाइन फसवणुक करण्याचे प्रकार केले जात असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त भानूप्रताप बर्गे यांना मिळाली. त्यानंतर पहाटे प्राईड आयकॉन सोसायटीत असलेल्या सदनिकेवर छापा टाकण्यात आला. अमेरिका आणि कॅनडातील नागरिकांची माहिती हार्डडिस्कवर साठविण्यात आली होती. पोलिसांनी या कारवाईत २५ हार्ड डिस्क, १४ लॅपटॉप तसेच आय ट्युन कार्ड जप्त केले.
प्रभारी अतिरिक्त पोलीस आयुक्त ज्योतीप्रिया सिंह, गुन्हे शाखेचे उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक आयुक्त भानूप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष बर्गे, गजानन पवार, उपनिरीक्षक सागर पानमंद, किरण औटी आदींनी ही कारवाई केली.