गुन्हे शाखेच्या तुरुंगातून पलायन केलेल्या आरोपीला ३३ वर्षांनी अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 05:16 PM2019-04-10T17:16:21+5:302019-04-10T17:19:21+5:30
चोरीच्या आरोपामध्ये अटकेत असताना या आरोपीने भिंतीवरून उडी मारून पलायन केले होते.
मुंबई - गुन्हे शाखेच्या तुरुंगातून पळून गेलेल्या आरोपीला 33 वर्षानंतर सोमवारी अटक केली. चोरीच्या आरोपामध्ये अटकेत असताना या आरोपीने भिंतीवरून उडी मारून पलायन केले होते.
गुन्हे शाखेच्या कक्ष क्रमांक ८ चे पोलीस अधिकारी अरुण पोखरकर आणि त्यांच्या पथकाने सोमवारी सलिम रुकिया खान याला जेरबंद केले आहे. 1984 साली झालेल्या चोरीच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर सलिमने तुरुंगाच्या भिंतीवरून उडी मारून पलायन केले होते. यानंतर त्याने गोरेगाव येथील राहते घर सोडून ठाण्यात मीरारोड येथे लपून राहत होता. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा लावून अटक करण्यात आली.
गेल्या 33 वर्षामध्ये त्याच्या ड्रेसिंग स्टाईलमध्ये बदल झाल्याने ओळख पटवणे थोडं अवघड होते असे पोखरकर यांनी सांगितले. गुन्हे शाखेचे अधिकारी तब्बल एक महिना त्याच्यावर नजर ठेवली होती आणि ओळख पटल्यानंतर त्याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. नव्वदच्या दशकामध्ये चोरीच्या गुन्ह्यामध्ये सलिम आणि तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, सलिम पळून गेला होता.