पुण्यात लिपिकाला लाच घेतल्याप्रकरणी रंगेहाथ अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 10:51 PM2019-10-10T22:51:36+5:302019-10-10T22:51:55+5:30
विभागात बाहेरुन वेगवेगळ्या कामासाठी येणाऱ्या लोकांकडून काम होण्यासाठी लाच घेतली जाते. अशा लाचखोर अधिकारी, कर्मचाऱ्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून सापळा रचून पकडलेही जाते.
पुणे : विभागात बाहेरुन वेगवेगळ्या कामासाठी येणाऱ्या लोकांकडून काम होण्यासाठी लाच घेतली जाते. अशा लाचखोर अधिकारी, कर्मचाऱ्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून सापळा रचून पकडलेही जाते. पण, आज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने एक वेगळा सापळा रचला होता. तोही एका लिपिकाच्या तक्रारीवरुन दुसऱ्या लिपिकाला लाच घेताना पकडण्यात आले. ही कारवाई पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता येथे करण्यात आली. निलेश वसंत मोडक (वय ३८, प्रथम लिपिक, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे
विभाग) असे अटक केलेल्या लिपिकाचे नाव आहे.
पाटबंधारे कार्यालयातील लिपिक म्हणून काम करणाऱ्या एका लिपिकाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यांच्याकडे असणारी शासकीय कामे प्रलंबित ठेवली म्हणून तक्रारदार यांचा कसूरी अहवाल पाठवून तक्रारदार यांच्यावर वरिष्ठांकडून गंभीर कारवाई करायला लावू असे निलेश मोडक याने सांगितले होते. गंभीर कारवाई होऊ न देण्यासाठी मोडक याने २
हजार रुपयांची लाच मागितली होती.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची गुरुवारी पडताळणी केली. त्यात मोडक याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पाटबंधारे विभागात सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून २ हजार रुपये स्वीकारताना मोडक याला रंगेहाथ पकडण्यात आले. बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.