पुणे जिल्ह्यात चोऱ्या करुन कोल्हापूरात फिरणाऱ्यास अटक; मोपेडसह एलईडी, मोबाईल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 21:50 IST2021-09-01T21:49:19+5:302021-09-01T21:50:00+5:30
Crime News : स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई

पुणे जिल्ह्यात चोऱ्या करुन कोल्हापूरात फिरणाऱ्यास अटक; मोपेडसह एलईडी, मोबाईल जप्त
कोल्हापूर : पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या करुन बेपत्ता असलेल्या चोरट्यास कोल्हापूरात शाहूमील परिसरात अटक केली. गणेश नारायण आदमिले (वय ३४ रा. मेथे डिअर चर्चचे मागे, तळेगाव, दाभडे, ता. मावळ जि. पुणे) असे अटक केलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून मोपेड, दोन एलईडी, दोन मोबाईल संच असा सुमारे ८५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसानी दिलेली माहिती अशी की, स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस पथके कोल्हापूर शहरात पेट्रोलींग करत असताना त्यांना राजारामपूरीतील शाहूमील परिसरात एका मोपेडस्वारास संशयास्पद रित्या ताब्यात घेतले, त्याच्याकडे चौकशी करता त्याने प्रथम उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्याने आपल नाव गणेश नारायण आदमिले असल्याचे सांगितले. तसेच त्याच्या ताब्यातील मोपेड, दोन एलईडी संच, दोन मोबाईल संच असा सुमारे ८५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. हा मु्द्देमाल त्याने पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
पोलिसांनी त्याला अटक करुन तळेगाव दाभाडे पोलिसांच्या ताब्यात दिले. अटक केलेल्या गणेश आदमिले याच्यावर कोल्हापूरसह सोलापूर, पुणे, मुंबई या जिल्ह्यात चोरीचे सुमारे १५ हून अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी दिली.