स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून १० लाखांची फसवणूक करणाऱ्यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 01:34 AM2020-01-23T01:34:53+5:302020-01-23T01:35:24+5:30
स्वस्तात सोने मिळवून देण्याच्या नावाखाली १० लाखांची फसवणूक करणा-यास ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने बुधवारी अटक केली.
ठाणे : स्वस्तात सोने मिळवून देण्याच्या नावाखाली १० लाखांची फसवणूक करणा-या रामप्रवेश लल्लनप्रसाद महातो ऊर्फ गोविंद खिडकी (५३, रा. सागाव, डोंबिवली, ठाणे) याला ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने बुधवारी अटक केली. त्याला सहार पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
मुंबईचे रहिवासी विक्रांत बारटक्के यांना स्वस्तात सोने मिळवून देण्याच्या नावाखाली गोविंद खिडकी याच्यासह आठ जणांनी १० लाखांची फसवणूक केली होती. गोविंद तसेच महिंद्र पारिंगे ऊर्फ महेंद्र पाटील (२५), राशीदअली शेख (३३), मंगेश शिनगारे (५०), राजू शिनगारे (५०), जावेद खान (३५), प्रवीण कांबळी (५३), मोहम्मद वसीम खान (२७) तसेच छोटू अशा नऊ जणांनी ९ मार्च २०१५ रोजी साकीनाका जंक्शन येथे बारटक्के यांच्याकडून १० लाख घेतले. पोलिसांची धाड पडल्याचा बनाव करून पैसे घेऊन त्यांनी पलायन केले. त्यानंतर, बारटक्के यांना त्यांचे सोने किंवा पैसेही त्यांनी परत केले नाही. याप्रकरणी सहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर महिंद्र पारिंगे याच्यासह सात जणांना अटक केली होती.
याप्रकरणातील छोटू आणि गोविंद हे दोघे हुलकावणी देत होते. यातील गोविंद हा ठाण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांना मिळाली. त्याआधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी त्याला पकडण्यात आले.