नाशिकच्या ग्रामीण पोलीस निरीक्षकासह हवालदाराला २ लाखांची लाच घेताना पुण्यात अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 12:33 PM2018-11-16T12:33:53+5:302018-11-16T12:34:40+5:30
नाशिक ग्रामीण पोलिसातील दिंडोरी पोलीस ठाण्यात तक्रारदार व त्यांच्या साथीदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे़.
पुणे : फसवणुकीच्या गुन्ह्यात वॉरंट न बजावण्यासाठी तसेच खटल्यात मदत करण्यासाठी २ लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी स्वारगेट परिसरात सापळा रचून नाशिक ग्रामीणच्या पोलीस निरीक्षकासह हवालदाराला अटक केली़.
पोलीस निरीक्षक राजेश सदाशिव शिरसाठ (वय ४८, पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण) आणि पोलीस हवालदार संजीव खंडेराव आहेर(वय ४८) अशी त्यांची नावे आहेत़.
नाशिक ग्रामीण पोलिसातील दिंडोरी पोलीस ठाण्यात तक्रारदार व त्यांच्या साथीदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे़.दिंडोरी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी या गुन्ह्यात प्राक्लेमेशनची (जाहीरनामा) नोटीस काढली आहे़. त्यात अटक करण्याची धमकी देऊन व तपास कामी मदत करण्यासाठी पोलीस निरीक्षक शिरसाठ व हवालदार आहिरे हे गुरुवारी पुण्यात आले होते़. यावेळी त्यांनी तक्रारदार यांच्याशी संपर्क साधून त्यांना वॉरंट बजावायचे नसेल तसेच खटल्यात मदत करावी, यासाठी २ लाख रुपयांची लाच मागितली होती़. तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती़. त्याची पडताळणी केल्यानंतर गुरुवारी दुपारी स्वारगेटजवळील मित्र मंडळ चौकाजवळ नेवैद्यम हॉटेलसमोर सापळा रचण्यात आला़. तक्रारदाराकडून २ लाख रुपये घेताना पोलीस हवालदार संजीव आहिरे यांना रंगेहाथ पकडण्यात आले़. यावेळी पोलीस निरीक्षक शिरसाट हे दुसरीकडे थांबले होते़. त्यांनी आहिरे यांना पैसे घेण्यासाठी पाठविले होते़ त्यांचे त्याबाबत तक्रारदाराशी झालेले संभाषण रेकॉर्ड करण्यात आले होते़.
लाच घेण्यामध्ये त्यांचाही सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने रात्री पोलीस निरीक्षक राजीव शिरसाठ यांनाही अटक करण्यात आली़. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.