देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार गजाआड
By प्रशांत माने | Published: June 20, 2024 03:09 PM2024-06-20T15:09:33+5:302024-06-20T15:10:15+5:30
पिस्तूल आणि सहा काडतूस हस्तगत
डोंबिवली: बेकायदेशीररित्या देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणा-या अंकुश राजकुमार केशरवानी ( वय २५) रा. दिलीप निवास, दत्तनगर, आयरेरोड, डोंबिवली पूर्व. या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला मानपाडा पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा लावून मंगळवारी जेरबंद केले. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, सहा जिवंत काडतुस आणि दोन मोबाईल असा १ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
डोंबिवली पुर्वेकडील मानपाडा हद्दीतील गोळवली परिसरात एक व्यक्ती बेकायदेशीररित्या पिस्तूल सोबत बाळगून फिरत असल्याची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली. वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक महेश राळेभात, संपत फडोळ, प्रशांत आंधळे, सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक भानुदास काटकर, पोलिस हवालदार राजेंद्र खिल्लारे, दिपक गडगे, शिरीष पाटील, सुनिल पवार, संजु मासाळ, विकास माळी, पोलिस नाईक यल्लापा पाटील, महादेव पवार, अनिल घुगे, शांताराम कसबे यांसह अन्य पोलिस कर्मचा-यांच्या पथकांनी गोळवळी परिसरात सापळा लावला आणि संशयास्पदरित्या फिरणा-या अंकुश केशरवानी ला जेरबंद केले.
त्याच्या अंगझडतीत पिस्तूल, सहा काडतूस आणि दोन मोबाईल मिळाले. त्याच्याविरोधात रामनगर पोलिस ठाण्यात मारहाणीचा गंभीर स्वरूपाचा १ गुन्हा दाखल आहे. अंकुशने पिस्तूल का बाळगले होते, ते कोणाकडून खरेदी केले होते. त्याचा तपास सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी दिली.