दाम्पत्यास जबर मारहाण करून लुटणाऱ्या दोघांना अटक; चोरट्यांकडून ८.७० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
By सुनील काकडे | Updated: May 12, 2023 18:16 IST2023-05-12T18:15:55+5:302023-05-12T18:16:39+5:30
वाशिमातील जुनी आययूडीपी कॉलनी येथील एका कुटुंबातील पती-पत्नीस घरात घुसून जबर मारहाण करत जबरी चोरीची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती.

दाम्पत्यास जबर मारहाण करून लुटणाऱ्या दोघांना अटक; चोरट्यांकडून ८.७० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
वाशिम : शहरातील जुनी आययूडीपी काॅलनीमध्ये वास्तव्यास असलेल्या दाम्पत्यास जबर मारहाण करून लुटणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. संबंधित आरोपींवर यापूर्वी घरफोडीचे १० गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून वाशिम पोलिसांनी ८.७० लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी १२ मे रोजी दिली.
वाशिमातील जुनी आययूडीपी कॉलनी येथील एका कुटुंबातील पती-पत्नीस घरात घुसून जबर मारहाण करत जबरी चोरीची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. यासह वाशिम शहरातीलच मानमोठे नगर, अवलिया बाबा नगर (शेलू रोड), सिव्हील लाईन्स, वाशिम ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील ग्राम काकडदाती येथे व इंगोले ले-आउट, कोंडाळा रोड, मालेगाव पोलिस स्टेशन हद्दीतील गीता नगर आदी ठिकाणी रात्रीच्या सुमारास घरफोडीच्या घटना घडल्या होत्या.
दरम्यान, या प्रकरणांचा तपास करत असताना घटनास्थळी पुरेशे तांत्रिक पुरावे उपलब्ध नव्हते; मात्र गोपनीय माहितीच्या आधारे तपास कौशल्य पणाला लावत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जबरी चोरीसह घरफोड्या करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना बुलढाणा येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ८.७० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
अटक आरोपींवर यापूर्वीदेखील वाशिम, बुलढाणासह विविध जिल्ह्यांमध्ये जबरी चोरी व घरफोडीचे १० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहे. त्यामुळे आरोपींविरुद्ध कडक कायदेशीर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर आरोपींचे इतर साथीदार तसेच त्यांचा इतर गुन्ह्यामध्ये सहभाग असल्यायाबाबत सखोल तपास सुरु आहे, असे पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी सांगितले.