बनावट इन्स्टाग्राम खाते बनवून अश्लील व्हिडिओ, छायाचित्रे शेअर करणारा अटकेत
By धीरज परब | Published: March 2, 2023 07:25 PM2023-03-02T19:25:48+5:302023-03-02T19:26:22+5:30
मीरा भाईंदर-वसई विरार पोलिसांच्या सायबर शाखेकडे आली होती तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - बनावट इन्स्टाग्राम आयडी तयार करून अश्लील व्हिडिओ व छायाचित्रे टाकणाऱ्याला सायबर गुन्हे शाखेने अटक केली आहे. अल्पवयीन मुलांचे अश्लील व्हिडीओ व लैंगिक शोषणा बाबत एका महिलेने मीरा भाईंदर - वसई विरार पोलिसांच्या सायबर शाखे कडे तक्रार केली होती. तक्रारदार महिलेची खाजगी छायाचित्रे व व्हिडीओ बनावट बनावट इन्स्टाग्राम आयडी तयार करुन प्रसिद्ध करण्यात आले होते. सायबर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर व पथकाने तांत्रिक विश्र्लेषण करून बनावट इन्स्टाग्राम आयडी तयार करून अश्लिल व्हिडीओ व फोटो पाठविणाऱ्याचा शोध सुरु केला.
या प्रकरणी प्रतिश कोठारी याला पोलिसांनी अटक केली असून नयानगर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास नयानगर पोलीस करत आहेत.
आपली खाजगी माहिती, फोटो, व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रसारीत करू नयेत. अनोळखी विनंती प्राप्त झाल्यास खात्री करूनच स्वीकारावी. फेसबुक, अकाउंट, लोगिन आयडी, पासवर्ड, ओटीपी कोणाला शेअर करू नये. कोणीही खाजगी फोटो, अश्लिल फोटो प्रसारीत करत असल्यास त्याबाबत www.cybercrime.gov . किंवा 1930 या सहायता क्रामांकावर संपर्क साधून तक्रार द्यावी असे आवाहन गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त अमोल मांडवे यांनी केले आहे .