अल्पवयीन मुलींना धाक दाखवून लैंगिक अत्याचार करणाऱ्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 04:00 PM2024-02-16T16:00:37+5:302024-02-16T16:00:44+5:30
गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांना यश
- मंगेश कराळे
नालासोपारा : अल्पवयीन मुलींना धाक दाखवून त्यांचेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या सिरियल रेपिस्टला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांना यश मिळाल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी शुक्रवारी दिली आहे.
आचोळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत १३ फेब्रुवारीला सकाळी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घरी झोपलेली असताना त्यांची ७ वर्षाची अल्पवयीन मुलगी ही तिचा चष्मा विसरल्याने तो घेण्यासाठी घरी आली होती. त्याचवेळी पिवळा टीशर्ट आणि निळी जीन्स घातलेला अंदाजे २५ ते ३० वयोगटातील एक तरुण बिल्डिंगमध्ये आला होता. त्याने त्या मुलीच्या हाताला पकडून ती विरोध करत असताना जबरदस्तीने त्याने तिच्या हाताला पकडून बिल्डींगच्या टेरेसवर नेऊन अनैसर्गिक जबरी संभोग करून पळून गेला होता. आचोळे पोलिसांनी फरार आरोपी विरोधात बलात्कार, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला.
वरीष्ठांच्या आदेश व सुचनांप्रमाणे गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे यांचे मार्गदर्शनाखाली अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार केली. गुन्ह्याच्या घटना स्थळावरून पळून जात असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालेल्या आरोपीच्या प्राप्त अस्पष्ट फोटोच्या आधारे शोध सुरू केला. तसेच आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे व मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी ह नालासोपारा एस टी डेपो जवळील झोपडपट्टीमध्ये व डोंबिवली येथे राहत असल्याची माहिती मिळाली.
तात्काळ दोन्ही ठिकाणी पोलीस पथके पाठवून आरोपीचा शोध घेतला. तपासात आरोपीचा मोबाईल नंबर मिळवून तांत्रिक विश्लेषनाद्वारे प्रवास करत असलेल्या अजमेर एक्सप्रेस या ट्रेनचा अचूक अंदाज घेऊन एक पथक तात्काळ गुजरातला रवाना केले. आरोपी हा सुरत शहरात आल्याने सुरत सिटी क्राईम ब्रांचच्या मदतीने आरोपीला सुरतमधून ताब्यात घेतले.
त्याची चौकशी केल्यावर त्याने आचोळे येथे केलेला गुन्हा कबूली दिल्यावर त्याला अटक करण्यात आले. अशाच प्रकारे या २८ वर्षीय आरोपीने तुळींजच्या हद्दीत सुमारे ४ ते ५ महिन्यांपूर्वी ओस्तवाल नगरी येथे एका ७ ते ८ वर्षाच्या मुलीला खेचून बिल्डींगच्या आडोशाला नेऊन तिच्यासोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीकडून २ गुन्ह्यांची उकल करून गुन्हा घडल्यापासून ४८ तासांमध्ये गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनीट दोनचे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, सपोनि सुहास कांबळे, सागर शिंदे, सहा.फौज. रमेश भोसले, संजय नवले, पो.हवा. रविंद्र पवार, प्रफुल्ल पाटील, चंदन मोरे, सचिन पाटील, जगदिश गोवारी, रमेश आलदर, दादा आडके, सुधीर नरळे, अमोल कोरे, मसुब/केकान, चौधरी, सायबरचे सहा.फौज संतोष चव्हाण व सुरत सिटी क्राईम ब्रांचच्या पोलिसांनी केली आहे.