उद्योजक भरतीयांच्या घरी चोरी करणाऱ्याला बिहारमधून अटक!
By आशीष गावंडे | Published: July 23, 2024 05:50 PM2024-07-23T17:50:42+5:302024-07-23T17:50:57+5:30
सहकार नगर मधील उद्योजक ब्रिजमोहन भरतीया यांच्या बंगल्यात शिरून चोरट्यांनी सुमारे ४४ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची घटना ३ मे रोजी मध्यरात्री घडली होती.
अकोला : शहरातील सहकार नगरमधील उद्योजक ब्रिजमोहन भरतीया यांच्या बंगल्यात धाडसी घरफोडी करणाऱ्या मुख्य सूत्रधाराच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी ७८ दिवसांच्या प्रदीर्घ शोध मोहिमेनंतर घरफोडीतील मुख्य सूत्रधाराला बिहार मधून शिताफिने अटक केल्याची माहिती मंगळवारी पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिली.
यादरम्यान, मुख्य आरोपीकडून २५ लाखांचे सोने जप्त करण्यात आले आहे. विवेक उर्फ चावल्या कमलाकर पिंपळे (४०) रा. ग्राम वझर, ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. तत्पूर्वी या प्रकरणात जिगर कमलाकर पिंपळे (३७) रा. पाखोरा ता. गंगापूर तसेच सुनील विठ्ठल पिंपळे (५०) रा. गुरु धानोरा ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर या दोघांना अटक करण्यात आली आहे.
सहकार नगर मधील उद्योजक ब्रिजमोहन भरतीया यांच्या बंगल्यात शिरून चोरट्यांनी सुमारे ४४ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची घटना ३ मे रोजी मध्यरात्री घडली होती. हा प्रकार ४ मे रोजी कुटुंबीयांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी खदान पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती. या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेळके यांना सखोल तपास करण्याचे निर्देश दिले होते.
ही कारवाई ‘एलसीबी’ पथकातील 'एपीआय' श्रीधर गुट्टे, पोलिस उपनिरीक्षक गोपाल जाधव, आशिष शिंदे, पोहवा अब्दुल माजिद, अविनाश पाचपोर, रवींद्र खंडारे, गोकुळ चव्हाण, खुशाल नेमाडे, वसीमोद्दीन, राहुल गायकवाड, सायबर सेलचे आशिष आमले, गोपाल ठोंबरे, प्रशांत कमलाकर, सीमा ढोणे तसेच जालना येथील दहशतवादी विरोधी पथकाचे विनोद गर्डे यांनी केली.
पाच राज्यात सात हजार किमीचा प्रवास
घरफोडी, जबरी चोरी व लुटमार करणे हा या टोळीचा परंपरागत व्यवसाय आहे. पोलिसांच्या ताब्यात सापडू नये, यासाठी ते मोबाईलचा वापर करत नाहीत. त्यामुळे या आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान स्थानिक गुन्हे शाखेसमोर उभे ठाकले होते. तपास पथकाने महाराष्ट्रासहित मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड तसेच बिहार अशा पाच राज्यांमध्ये विविध ठिकाणी तब्बल सात हजार किलोमीटरचा प्रवास करून आरोपींचा छडा लावला, हे येथे उल्लेखनीय.
आरोपी पळून जाण्याच्या बेतात
घरफोडी प्रकरणातील मुख्य सूत्रधार विवेक पिंपळे हा बिहार मधील एका गावात असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली. पोलिस उपनिरीक्षक गोपाल जाधव व त्यांचे पथक तातडीने बिहारकडे रवाना झाले. आरोपीला पोलिसांचा सुगावा लागताच तो पळून जाण्याच्या बेतात होता; परंतु, त्यापूर्वीच पथकातील पोलिसांनी त्याला शिताफीने अटक केली. यापूर्वीही मुख्य आरोपीने पोलिसांना मध्य प्रदेशातील विदिशा येथून गुंगारा दिला होता. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले सर्व अवजारे, हत्यार व सोने जप्त केले.