काजू खरेदीच्या नावे गंडा घालणाऱ्यास अटक; दीड कोटींची केली होती फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 02:25 AM2019-06-08T02:25:44+5:302019-06-08T02:25:50+5:30
बनावट नावाने अष्टविनायक ट्रेडिंग नावाचे बनावट कंपनीचे कार्यालय कापूरबावडी जंक्शन येथील हायलॅण्ड कॉर्पोरेट पार्क येथे सुरू केले. काजू खरेदीविक्रीचे व्यापारी आणि एजंट असल्याचे भासवून मुजावरसह आणखी पाच जणांचा त्यांनी विश्वास संपादन केला
ठाणे : काजू खरेदीविक्रीचे व्यापारी असल्याचे भासवून काही शेतकऱ्यांकडून १४ हजार ९१० किलो काजूगर खरेदी करून नंतर त्यांचे पैसे न देता एक कोटी तीन लाख ४२ हजार ८३८ रुपयांना गंडा घालणाºया मुख्य सूत्रधाराला कच्छ गुजरात येथून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी अटक केली. त्याला १३ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
कोल्हापूरच्या शिणोली (ता. चंदगड) येथील खालीद मुजावर (३५) यांच्या तक्रारीनुसार सुमित असनानी आणि अमितकुमार असनानी यांनी बनावट नावाने अष्टविनायक ट्रेडिंग नावाचे बनावट कंपनीचे कार्यालय कापूरबावडी जंक्शन येथील हायलॅण्ड कॉर्पोरेट पार्क येथे सुरू केले. काजू खरेदीविक्रीचे व्यापारी आणि एजंट असल्याचे भासवून मुजावरसह आणखी पाच जणांचा त्यांनी विश्वास संपादन केला. त्यानंतर, त्यांच्याकडून १४ हजार ९१० किलो वजनाचे काजूगर खरेदी करून त्या मालाची परस्पर विक्री केली. त्यातून आलेले पैसे मुजावर आणि इतरांना न देता त्यांची फसवणूक केली. त्यानंतर, सुमित आणि अमितकुमार हे कार्यालय बंद करून पसार झाले होते. या प्रकारानंतर मुजावर यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात २७ नोव्हेंबर २०१८ रोजी फसवणुकीचा गुन्हाही दाखल केला.
पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी हे प्रकरण ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ च्या पथकाकडे सोपवले. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि त्यांच्या पथकाने दीपकभाई भरतभाई पटेल ऊर्फ अमितकुमार असनानी यास सिंगरवा गाव, अहमदाबाद येथून ४ डिसेंबर २०१८ रोजी अटक केली होती. मात्र, यातील मुख्य सूत्रधार सुमितकुमार राजेश असनानी ऊर्फ महेश भोजराज ग्यानचंदानी हा पोलिसांना हुलकावणी देत होता.
दरम्यान, तो गुजरात येथील
कच्छ जिल्ह्यात असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांना मिळाली. याच माहितीच्या आधारे सापळा रचून त्याला गुरूवारी अटक केली. त्याच्याकडून सात लाख ३५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.