ब्रँडेड शर्टचे लेबल लावून बनावट शर्ट्स विकणाऱ्यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 09:10 PM2018-10-18T21:10:02+5:302018-10-18T21:22:21+5:30
भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शितल राऊत आणि त्यांच्या पथकाने जोशी याच्या भिवंडीतील श्री अरिहंत कॉम्प्लेक्समधील कारखान्यावर धाड टाकत कारवाई केली. याप्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई - कमी दर्जाच्या कपड्याचे शर्ट तयार करून या शर्टवर नामांकित कंपनीच्या ब्रँडच्या शर्टचे लोगो, किंमत, कागदी रिबन लावून शर्टची विक्री करणाऱ्या भिवंडीतील एका गारमेंट कारखान्यावर भिवंडी गुन्हे शाखेने धाड टाकून ७ लाख ७५ हजार रुपायांचा ७७६ शर्टसह इतर मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी भरत हसमुखराय जोशी (वय ६०) याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. जोशी हा घाटकोपर येथे राहणार आहे.
सियाराम सिल्क मिल प्रा. लि. कंपनीच्या ब्रँडेड शर्ट कमी दर्जाच्या कपड्याच्या सहाय्याने तयार करून ते शर्ट ब्रँडेड असल्याचे भासवले जात होते. या ब्रँडेड शर्टची नक्कल विक्री होत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शितल राऊत आणि त्यांच्या पथकाने जोशी याच्या भिवंडीतील श्री अरिहंत कॉम्प्लेक्समधील कारखान्यावर धाड टाकत कारवाई केली. याप्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.