अश्लील मेसेज, व्हिडीओ कॉल करून विनयभंग करणाऱ्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 07:41 PM2021-12-31T19:41:52+5:302021-12-31T19:54:56+5:30
Crime News : गुरदीपसिंग चतुरसिंग खालसा रा. उल्हासनगर असे अटक आरोपीचे नाव आहे.
कल्याण - जाहिरातीचा व्हिडीओ बनविण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून इंटरनॅशनल व्हर्चुअल मोबाईलवरून 29 वर्षीय तरूणीला अश्लील मेसेज पाठवून व व्हीडीओ कॉल करून विनयभंग करणाऱ्या 27 वर्षीय तरूणाला महात्मा फुले चौक पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. गुरदीपसिंग चतुरसिंग खालसा रा. उल्हासनगर असे अटक आरोपीचे नाव आहे.
12 नोव्हेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीत वेगवेगळया मोबाईल नंबरवरून कल्याण येथे राहणाऱ्या तरूणीला अश्लील मेसेज आणि कॅमेरा बंद करून व्हीडीओ कॉल यायचे. याप्रकरणी तरूणीने महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती. वरीष्ठ पोलिस निरिक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक लक्ष्मण कांबळे आणि सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक यशवंत जाधव यांच्या पथकाने खाजगी सायबर तज्ञ यांच्या माध्यमातून तांत्रिक तपास केला असता दोन मोबाईल नंबरवरून संबंधित अश्लील मेसेज आणि व्हीडीओ कॉल केले गेले असल्याचे उघड झाले. अधिक तपास करता हे नंबर उल्हासनगर कॅम्प नं 5 मध्ये राहणारा गुरूदिपसिंग खालसा याचे असल्याचे समोर आले. त्याला पोलिसांनी गुरूवारी ताब्यात घेऊन पोलीसी खाक्या दाखविला असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले. त्याच्या मोबाईलमध्ये अश्लील मेसेज पाठविल्याचे दिसून आले. त्याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्याला रविवार्पयत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
संतापजनक! अवघ्या ५० रुपयांसाठी पित्यानेच केला दहा वर्षीय मुलाचा खून
रागातून केले कृत्य
आरोपी गुरूदीपसिंग हा फॅशन शो साठी इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करून महिलांचे व्हिडीओ बनवुन युटयुब चॅनलवर अपलोड करीत असतो. पाच वर्षापुर्वी तक्रारदार तरूणीने गुरूदीपसिंग बरोबर जाहीरातीचा व्हिडीओ बनविण्यास नकार दिला होता. तो राग मनात धरून गुरूदीपसिंगने इंटरनॅशनल व्हर्चुअल मोबाईलवरून वेगवेगळया नंबरवरून संबंधित तरुणीला अश्लील मेसेज आणि व्हीडीओ कॉल केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहीती वरीष्ठ पोलिस निरिक्षक होनमाने यांनी दिली.