मार्केटयार्ड येथील दिवाणजीला लुटणाऱ्या तीन जणांना अटक, दोघे सराईत गुन्हेगार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 06:23 PM2020-07-31T18:23:42+5:302020-07-31T18:26:20+5:30
तीन दिवस दिवाणजीवर पाळत ठेवून रेकी केली.
पुणे : व्यापारातून जमा झालेली रोकड बॅंकेत जमा भरण्यासाठी निघालेल्या दिवाणजीला रस्त्यात गाठून राॅडने हल्ला करन लुटणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने पकडले. थापा उर्फ विकास गोविंद कांबळे( वय २१, रा. लोहियानगर), मयुर सुरेश जाधव (वय १९, रा. जनता वसाहत), अक्षय रमेश नवले ( वय१९, रा. जनता वसाहत) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. यातील कांबळे आणि नवले हे दोघे सराईत गुन्हेगार आहेत.
यावेळी आरोपींच्या ताब्यातून चोरी केलेली रोकड व दुचाकी असा, ३ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी त्यांना मार्केट यार्डपोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
याबाबत दिवाणजी सुमंतीलाल चंदनलाल ओस्तवाल (वय ६९, रा. गंगानगर, आकुर्डी प्राधिकरण) यांनी मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्याच्या अनुषगाने तपास करत असताना, सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींची ओळख पटवली असता, कर्मचारी रमेश चौधर यांना तिघे आरोपी रामटेकडी परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांच्या सुचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक दत्ताजी मोहिते, हवालदार उदय काळभोर, चिखले, गरुड, येलपल्ले यांनी सापळा रचून तिघांना अटक केली
तीन दिवस केली होती रेकी....
थापा उर्फ विकास कांबळे हा सराईत गुन्हेगार आहे. दोन महिन्यापुर्वी तो तेल घेण्यासाठी दुकानात आला होता. त्यावेळी त्याने दिवसभराचा दुकानातील गल्ला पाहिला होता. त्यामुळे त्याला दिवाणजी कधी गल्ल्यातून पैसे जमा करतात आणि बॅंकेत भरायला जातात याची माहिती होती. आरोपींनी तीन दिवस दिवाणजीवर पाळत ठेवून रेकी केली. आदल्या दिवशी जमा झाले मात्र दिवाणजी पैसे भरण्यासाठी गेले नाहीत. त्यानंतर परत दुसऱ्या दिवशी तिघांनी पाहणी केली. त्यावेळी ते बॅगेत पैसे घेऊन निघालेले दिसले. त्यानुसार वाटेत आडवे थांबून डोक्यात राॅडने मारहाण करत त्यांच्याकडील रोकड जबरदस्तीने हिसकावून आरोपींनी पळ काढला होता.
ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली.