तरूणींना अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देणारा जेरबंद; आरोपीवर राज्यभर गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 07:09 PM2020-07-06T19:09:27+5:302020-07-06T19:10:58+5:30
मुलींनी सावधानता बाळगून आपले चारीत्र्याची बदनामी होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे
बारामती: बनावट फेसबुक अकाऊंटद्वारे तरूणींचे अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या नराधमास बारामती ग्रामीण पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अखेर जेरबंद केले. हा आरोपी फेसबुव्दारे तरूणींचे मोबाईल क्रमांक मिळवून त्याच्यासोबत बोलण्यासाठी दबाव टाकत असे. एखादी तरूणी न बोललल्यास सबंधित तरूणीला तिचे बनावट अश्लिल फोटो फेसबुकवर व्हायरल करण्याची धमकी हा आरोपी देत होता. राज्यभर या आरोपीवर अनेक गुन्हे दाखल झाले होते, अशी माहिती गुन्हे शोध पथकाच्या वतीने देण्यात आली.
संदीप सुखदेव हजारे (वय २९, रा. आंबवडे, ता. खटाव, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून दहिवडी येथून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच त्याच्यावर समर्थ पोलीस ठाणे पुणे, घारगाव पोलीस ठाणे अहमदनगर, कराड पोलीस ठाणे, संगमनेर पोलीस ठाणे, या पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध मुलींना अश्लिल फोटो व्हायरल करण्याच्या धमक्या दिल्या प्रकरणी गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने बारामती तालुक्यातील एका गावातील एका तरुणीला तिचे बनावट अश्लिल फोटो पाठवून तेच फोटो वायरल करण्याची धमकी दिली होती. त्यानुसार तरुणीने बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने रविवारी (दि. ५) रोजी रात्री गुन्हे शोध पथकाने छडा लावत आरोपीला दहिवडी ( ता. खटाव, जि.सातारा ) येथून ताब्यात घेतले आहे, बारामती तालुका गुन्हेशोध पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे यांनी त्यांच्या पथकाला घेऊन आरोपीच्या घरी जाऊन त्याला अटक केली. आरोपीने शंभरहून अधिक मुलींना फेसबुकवरून त्यांचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन, त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असू शकतात, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
फेसबुकवर मुलींचे नंबर घेऊन त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढणे, नंतर त्यांच्याकडून पैशांची मागणी करत मानसिक त्रास देऊन, अश्लील बनावट फोटो बनवून धमक्या दिल्या जातात. याबाबत मुली बदनामी खातीर तक्रार देण्यासाठी घाबरत असतात. यामुळे समाज विकृत आणखी मुलींना छेडण्याचा प्रयत्न करतात यामुळे आशा इसमांवर सायबर गुन्हेगारी अंतर्गत कारवाई होण्यासाठी मुलींनी बळी न पडता पोलीसांकडे तक्रार देणे गरजेचे आहे.
बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमुख योगेश लंगुटे, पोलीस नाईक परिमल माणेर, नंदू जाधव, मंगेश कांबळे, विनोद लोखंडे यांनी ही कामगिरी बजावली आहे.
..............................
सध्या सोशल मीडिया वापरण्याचे प्रमाण वाढून मुलींसहीत तरुणांच्या देखील फसवणुकी, बदनामीला बळी पडत आहेत. फेसबुक वापरणाऱ्या तरुणी, महिला यांनी अनोळखी व्यक्तीपासून सावधानता बाळगून आपली बदनामी होणार याची काळजी घ्यावी, तसेच कुणाच्या बाबतीत वरील प्रमाणे तक्रारी असल्यास न डगमगता पोलिसांशी संपर्क साधावा, तक्रार देणाऱ्या व्यक्तीचे नाव गुपित ठेवण्यात येईल.- अण्णासाहेब घोलप, पोलीस निरीक्षक, बारामती ग्रामीण पोलीस ठाणे.