शिवसेना शहरप्रमुखासह दोघांना अटक; पैसे चोरल्याच्या आरोप : एक दिवसाची कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 05:57 AM2022-07-31T05:57:19+5:302022-07-31T05:57:45+5:30
एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना पक्षात वाद आहे. दोन्ही गटांकडून शिवसेनेवर दावा केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : पश्चिमेतील दीनदयाळ रोडवरील शिवसेना शाखेत शुक्रवारी झालेला वाद विकोपाला गेला आहे. शहरप्रमुख विवेक खामकर यांनी पैसे आणि कागदपत्रे चोरल्याच्या आरोपावरून विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी खामकरसह अन्य एकाला अटक केली आहे. या दोघांना पोलिसांनी कल्याण न्यायालयात हजर केले असता दोघांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना पक्षात वाद आहे. दोन्ही गटांकडून शिवसेनेवर दावा केला जात आहे. दीनदयाळ रोडवरील शिवसेना शाखेत शाखाप्रमुख परेश म्हात्रे आणि पवन म्हात्रे हे दोघे बसलेले असताना तेथे खामकर व त्यांचे समर्थक पोहोचले. खामकर यांनी परेश यांच्याकडे विचारणा केली की, तुम्ही कोणत्या गटात आहात. त्यावेळी परेश यांनी आम्ही शिवसेनेत आहोत. आम्ही कोणत्याही गटात गेलेलो नाही, असे सांगितले. त्यानंतर खामकर शाखेबाहेर आले. तेथे त्यांनी शाखेबाहेर एक बॅनर पाहिला. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचेही फोटो होते. ते पाहून खामकर यांनी तो बॅनर फाडला. म्हात्रे यांनी त्यांना मज्जाव केला असता त्यांच्यात झटापट झाली. दरम्यान, शाखेतील टेबलावर ठेवलेले महत्त्वाचे कागदपत्र आणि १५ हजार रुपये असलेली पिशवी गायब झाली. याप्रकरणी म्हात्रे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी खामकर, श्याम चौगुले यांच्याविरोधात पैसे चोरल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवला आहे.
शिंदे-सेना गटातील वादातून प्रकार
शिंदे यांच्या राजकीय बंडानंतर डोंबिवलीचे शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे हे शिंदे यांना पाठिंबा देत त्यांच्या गटात सामील झाले.
त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी डोंबिवली शहरप्रमुखपदी खामकर यांची नियुक्ती केली होती.
शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील वादातून खामकर यांच्यावर पैसे चोरी आणि बॅनर फाडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पोलीस तपासाअंतीच या आरोपात किती तथ्य आहे, हे स्पष्ट होणार आहे.