अरुण गवळीच्या नावाने खंडणीची मागणी; चौघांना अंबोली पोलिसांकडून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 01:52 AM2018-11-18T01:52:54+5:302018-11-18T01:54:42+5:30
कुख्यात अंडरवर्ड डॉन अरुण गवळी याच्या नावाने खंडणी मागणाऱ्या चौघांच्या मुसक्या शनिवारी पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने आवळल्या आहेत. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.
मुंबई : कुख्यात अंडरवर्ड डॉन अरुण गवळी याच्या नावाने खंडणी मागणाऱ्या चौघांच्या मुसक्या शनिवारी पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने आवळल्या आहेत. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे. संजय वोर्पे (४४), निवृत्ती यादव (३८), संतोष शिरूरकर (३४) आणि ईश्वर शिंदे (२२) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
उत्तर प्रदेशमधील मॉडर्न पब्लिक स्कूलमध्ये बाल दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यातील तक्रारदार करणसिंग (२८) हे कार्यक्रमासाठी कलाकार उपलब्ध करून देण्याचे काम करतात. त्यामुळे १६ आॅक्टोबर रोजी ‘शुभमंगल इव्हेंट’ कंपनीतून करणसिंग यांना अजय शर्मा यांचा फोन आला. कार्यक्रमात अभिनेत्री अमिषा पटेल यांना बोलाविण्याची विनंती शर्मा यांनी केली. त्यानुसार, अमिषाचे मॅनेजर अनिल जैन यांना करणसिंगनी फोन केला. तेव्हा अमिषाला कार्यक्रमासाठी ५ लाख द्यावे लागतील, असे त्यांनी सांगितले. करणसिंग यांनी शर्माला फोन करून ५ लाख अमिषाला आणि त्यांच्या कमिशनचे १ लाख असा एकूण ६ लाख रुपयांचा खर्च येईल, असे सांगितले. शर्माने ६ लाख रुपये करणसिंग यांना दिले. त्यांनी त्यातील ५ लाख रुपये २० आॅक्टोबरला जैनला दिले. मात्र, कार्यक्रमाला अमिषा न आल्याने करणसिंग यांनी जैनकडे विचारणा केली. तेव्हा पैसे परत न दिल्यास कायदेशीर कारवाई करा, असे जैन, अमिषाचा कायदेशीर सल्लागार दिनेश पाल यांनी सांगितले.
त्यानंतर, १५ नोव्हेंबरला करणसिंग यांना अनोळखी नंबरवरून फोन आला. रात्री साडेअकराच्या सुमारास अंधेरीच्या इन्फिनिटी मॉलजवळ भेटायला बोलावले. त्या वेळी ‘पोलीस’ लिहिलेल्या गाडीत चौघे आरोपी बसले होते. त्यातील वोर्पे याने अखिल भारतीय सेनेचे कार्ड दाखवत आम्ही अरुण गवळीसाठी काम करतो, असे सांगितले. मॉडर्न स्कूलच्या कामाचे पैसे परत कर, अन्यथा तुला १० लाख रुपये द्यावे लागतील. नाहीतर तुला आम्ही ठार मारू, असे धमकावले, तसेच १६ नोव्हेंबरला पैसे तयार आहेत का, अशी विचारणा करणारा फोन करण्यात आला. पैसे देण्याची तयारी करणसिंग यांनी दाखविली. मात्र, जिवाच्या भीतीने या विरोधात अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार, सापळा रचून एक लाखांची रक्कम घेताना अंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने चौघांना अटक केली.