Aryan Khan Arrested: ड्रग्जबद्दल नेमका कायदा काय सांगतो; शाहरुखचा मुलगा आर्यन खानला शिक्षा होऊ शकते का?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 06:24 AM2021-10-06T06:24:05+5:302021-10-06T06:24:31+5:30
एनडीपीएस ॲक्ट १९८५ अन्वये प्रतिबंधित अमली पदार्थांचे सेवन करणे, विक्री आणि खरेदीच्या व्यवहारात सहभागी असण्याचा आरोप आहे.
सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान कॉर्डेलिया द इम्प्रेस या क्रुज शिपवरील रेव्ह पार्टीत सापडल्यापासून जोरदार चर्चेत आहे. अमलीपदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) त्याच्यावर अनेक कलमं लावली आहेत. एका दिवसाच्या कोठडीनंतर आर्यनचा आणखी तीन दिवसांसाठी कोठडीत मुक्काम वाढला आहे. या प्रकरणात एनसीबी आणखी खोलात जाण्याची शक्यता दिसतून येत आहे. त्यात शाहरुखच्या मुलाला शिक्षाही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यानिमित्ताने आर्यनवर लावलेली कलमे आणि त्याबद्दलची माहिती...
आर्यनवर काय आहेत आरोप?
एनडीपीएस ॲक्ट १९८५ अन्वये प्रतिबंधित अमली पदार्थांचे सेवन करणे, विक्री आणि खरेदीच्या व्यवहारात सहभागी असण्याचा आरोप आहे. आर्यनवर एनडीपीएस ॲक्ट १९८५ कायद्याच्या सेक्शन ८(सी), २०(बी), २७ आणि ३७ या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या अंतर्गत आरोप सिद्ध झाल्यास एक वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते आणि शिवाय दंडही होऊ शकतो.
एनडीपीएस ॲक्ट १९८५ च्या या कलमांचा अर्थ काय?
- कलम ८ - एखाद्या अमलीपदार्थाची जाणूनबुजून खरेदी करणे किंवा त्याचा वापर करणे हा गुन्हा मानला जातो. अमली पदार्थ जवळ सापडल्यास हे कलम लावले जाते.
- कलम २० - गांजा/चरस सारखे अमलीपदार्थ बाळगणे, विक्री-खरदी करणे, सेवन करणे गुन्हा मानले जाते. आर्यनकडे सापडलेले चरस या कायद्यानुसार 'स्मॉल' कॅटेगिरीत येते. त्यासाठी ६ महिन्यांची शिक्षा किंवा १० हजारांचा दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात.
- कलम २७ - अमली पदार्थांचे सेवन केल्यास कलम लावले जाते. यात अधिकाधिक १ वर्षांची शिक्षा होऊ शकते.
- कलम ३५ - अमलीपदार्थ बाळगणाऱ्याची मानसिक स्थिती कशी होती, त्याचा उद्देश काय होता हे या कलमानुसार ठरवले जाते. कायद्याचे उल्लंघन करण्याचा आपला उद्देश नव्हता, हे आरोपीला सिद्ध करावे लागते. त्याला हेही सिद्ध करावे लागेल की त्याच्याकडे असलेला अमलीपदार्थ हा बंदी असलेला पदार्थ आहे.