Aryan Khan Drugs Case: आर्यन खान प्रकरणाला नवं वळण! पंचनामा म्हणून कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या, गोसावीच्या बॉडीगार्डचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 12:34 PM2021-10-24T12:34:27+5:302021-10-24T12:51:57+5:30
Aryan Khan Drugs Case: अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) सध्या मुंबईतील ड्रग्ज क्रूज पार्टी प्रकरणी आर्थर रोड तुरुंगात आहे.
Aryan Khan Drugs Case: अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) सध्या मुंबईतील ड्रग्ज क्रूज पार्टी प्रकरणी आर्थर रोड तुरुंगात आहे. आर्यनच्या न्यायालयीन कोठडीत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्याचे वकील आर्यनला जामीन मिळवून देण्यासाठी जंग जंग पछाडताना दिसत आहेत. यातच आता आर्यन खान प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.
आर्यन खानला जेव्हा अटक करुन एनसीबीच्या कार्यालयात आणण्यात आलं होतं. त्यावेळी आर्यनचा हात पकडून त्याला एनसीबीच्या कार्यालयात घेऊन येणाऱ्या व्यक्तीचा आर्यन खानसोबतचा एक सेल्फी व्हायरल झाला होता. या व्यक्तीची ओळख किरण गोसावी या नावानं पटली आणि तो एनसीबीचा अधिकारी नसून एक खासगी गुप्तहेर असल्याचं सांगितलं होतं. एनसीबीनंही संबंधित व्यक्ती एनसीबीचा कर्मचारी नसल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. जर तो एनसीबीचा अधिकारी नव्हता मग आर्यनचा हात पकडून त्यानं एनसीबीच्या कार्यालयात त्याला कोणत्या अधिकाराखाली आणलं? असा सवाल उपस्थित केला गेला. यावरुन बराच वाद झाल्यानंतर एनसीबीनं पत्रकार परिषद घेत किरण गोसावी याप्रकरणातील साक्षीदारांपैकी एक साक्षीदार असल्याचं सांगितलं होतं. आता याच किरण गोसावीच्या बॉडीगार्डनं धक्कादायक खुलासा केला आहे.
आर्यन खान प्रकरणात नाव समोर आल्यानंतर फरार झालेल्या किरण गोसावी याचा बॉडीगार्ड प्रभाकर सैल यानं 'आजतक' या हिंदी वृत्त वाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी क्रूझवर केलेल्या छापेमारीवेळी आपल्याकडून जबरदस्तीनं कोऱ्या कागदांवर पंचनामा म्हणून साक्षीदाराच्या रुपात सह्या घेण्यात आल्या, असा दावा प्रभाकर सैल यानं केला आहे. आपल्याला अटक करण्यात आलेल्यांबाबत कोणतीही माहिती नव्हती, असंही तो म्हणाला आहे. क्रूजवरील छापेमारीचा तो साक्षीदार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
समीर वानखेडे यांच्याकडून जीवाला धोका
ड्रग्ज छापेमारी प्रकरणाचा साक्षीदार असलेल्या प्रभाकर यानं किरण गोसावी याचा बॉडीगार्ड म्हणून काम केलं असल्याचा दावा केला आहे. ड्रग्ज छापेमारीच्या रात्री आपण गोसावीसोबतच होतो आणि एनसीबीच्या कारवाईनंतर गोसावी एनसीबीच्या कार्यालयाजवळच एका सॅम नावाच्या व्यक्तीला भेटला होता, असाही दावा प्रभाकर यांनी केला आहे. गोसावी सध्या गायब झाला आहे कारण त्याच्या जीवाला समीर वानखेडे यांच्याकडून धोका आहे, असंही प्रभाकर म्हणाला आहे.
दरम्यान, प्रभाकर सैल यांनी केलेल्या आरोपांवर जशास तसं उत्तर दिलं जाईल असा दावा एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी केला आहे.