Aryan Khan Drug Case: ...तर आर्यन पुन्हा करेल अमली पदार्थांचे व्यवहार; विशेष न्यायालयाने नोंदवले निरीक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 08:48 AM2021-10-21T08:48:49+5:302021-10-21T08:49:48+5:30
व्हॉट्सॲप चॅटवरून सकृतदर्शनी आर्यन खान हा अमली पदार्थ विक्रेत्यांच्या संपर्कात असल्याचे सिद्ध होते, असे निरीक्षण विशेष न्या. व्ही. व्ही. पाटील यांनी नोंदविले.
मुंबई : आर्यन खानच्या व्हॉट्सॲप चॅटवरून तो अमली पदार्थांसंदर्भात नियमित व्यवहार करत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे त्याची जामिनावर सुटका केली तरी पुन्हा असे कृत्य करणार नाही, याची खात्री देऊ शकत नाही. त्यामुळे तपास सुरू असताना त्याची जामिनावर सुटका करणे योग्य नाही, असे निरीक्षण विशेष एनडीपीएस न्यायालयाने आर्यन खानचा जामीन फेटाळताना नोंदविले.
व्हॉट्सॲप चॅटवरून सकृतदर्शनी आर्यन खान हा अमली पदार्थ विक्रेत्यांच्या संपर्कात असल्याचे सिद्ध होते, असे निरीक्षण विशेष न्या. व्ही. व्ही. पाटील यांनी नोंदविले.
न्यायालयाने २१ पानांच्या निकालात म्हटले आहे की, आर्यन खान व त्याचा मित्र अरबाज मर्चंट यांनी अमली पदार्थ बाळगले होते. आर्यनच्या ताब्यातून अमली पदार्थ जप्त करण्यात आले नसले तरी अरबाजकडे अमली पदार्थ आहे, याची माहिती आर्यनला होती.
आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मूनमून धमेचा यांचा गंभीर गुन्ह्यातील सहभाग पाहता ते जामिनावर सुटण्यास पात्र नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.
एनसीबीने सादर केलेल्या साहित्यावरून एनडीपीएस कायद्यातील कलम २९ जे कट रचण्यासंबंधी आहे, ते या प्रकरणी लागू होते. आरोपीने एनडीपीएस कायद्याअंतर्गत कोणताही गुन्हा केला नाही, असे समाधान तपासाच्या या टप्प्यावर मानणे योग्य नाही, असे निकालात म्हटले आहे.
आर्यन खान, अरबाज मर्चंटने डे दिलेल्या जबाबानुसार, त्यांनी आनंद लुटण्यासाठी व सेवन करण्यासाठी अमली पदार्थ बाळगले होते, असेही न्यायालयाने निकालात म्हटले आहे.
‘अरबाजने अमली पदार्थ लपविल्याचे माहीत होते’
अर्थ आरोपी क्र. १ (आर्यन खान) याला आरोपी क्र. २ (अरबाज मर्चंट) याने बुटांमध्ये अमली पदार्थ लपविल्याची माहिती होती. तसेच आरोपी क्र. १ च्या व्हॉट्सॲप चॅटवरून तो मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ खरेदीबाबत चर्चा करत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावरून आरोपी क्र. १ बेकायदेशीरपणे अमली पदार्थ बाळगणाऱ्यांच्या संपर्कात होता. याचा अर्थ एनसीबीने कटाचा आणि अन्य लोकांना प्रवृत्त (अमली पदार्थाचे सेवन) केल्याचा लावलेला आरोप सकृतदर्शनी योग्य आहे,’ असेही या निकालात म्हटले आहे.
गुरुवारी उच्च न्यायालयात आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मूनमून धमेचा यांच्या जामिनावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.