तिघांनी मिळून चोरल्या आठ लाखांच्या तब्बल २९ दुचाकी, नाशिकमधील घटना
By अझहर शेख | Published: October 1, 2022 04:46 PM2022-10-01T16:46:25+5:302022-10-01T16:47:46+5:30
पोलिसांनी ठोकल्या बेड्या, सर्व दुचाकी हस्तगत
नाशिक: शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाल्याने नाशिकरोड पोलिसांनी दुचाकी चोरीविरुद्ध ठोस पावले उचलली. दुचाकी चोरी विरोधी पथकाने गोपनीय माहिती काढत एकापाठोपाठ तीघा संशयितांना ताब्यात घेत ‘खाकी’चा हिसका दाखविला. चोरट्यांनी शहरासह जिल्ह्यातून तसेच शेजारच्या धुळे, जळगावमधूनसुद्धा पाच दहा नव्हे तर तब्बल २९ दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तीघांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्या ताब्यातून दडवून ठेवलेल्या चोरीच्या सर्व दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
शहर परिसरात मोटरसायकल चोरीच्या घटना वाढीस लागल्याने पोलीस आयुक्तांच्या आदेशाने विशेष पथक नेमण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, दुय्यम पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या मार्गदर्शनाखाली एक अधिकारी व दहा अंमलदारांचे दुचाकीचोरीविरोधी पथक स्थापन केले गेले. या पथकाने दुचाकीचोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरु केला. घटनास्थळांवरील सीसीटीव्ही फुटेज मिळवून संशयितांची ओळख पटविण्यास सुरुवात केली.
दरम्यान पोलीस कर्मचारी विशाल पाटील व मनोहर शिंदे यांना दुचाकी चोरणाऱ्या संशयित युवकाबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत सांगितले. यानंतर पथकाने सिडको येथून पहिला संशयित अतुल नाना पाटील (२६,रा. मूळ रा. पथराड ता. भडगाव, जळगाव) चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याने दोन साथीदारांसह नाशिक शहर व ग्रामीण तसेच धुळे, जळगाव जिल्ह्यातून मोटरसायकली चोरल्याची कबुली पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी त्याचे साथीदार संशयित पवन रमेश पाटील (२६ रा. सामनेर, पाचोरा, हल्ली रा. सिडको) व ऋतिक उत्तम अडसुळे (२२ रा. चेहेडी) यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी नाशिकरोड, इंदिरानगर, सातपूर पोलीस ठाण्याचे हद्दीतून प्रत्येकी एक, ग्रामीण भागातून चार, धुळे जिल्ह्यातून सात, जळगाव जिल्ह्यातून एक अशा एकूण १५ दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. या तीघांनी आतापर्यंत ७ लाख ७० हजार रुपये किमतीच्या २९ दुचाकींची चोरी केल्याचे तपासात समोर आले आहे.