वांद्र्यात तब्बल चार हजारांवर बनावट प्रतिज्ञापत्रे सापडली; ठाकरे गटाची?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 05:50 AM2022-10-10T05:50:58+5:302022-10-10T05:51:27+5:30
गुन्हा दाखल करून पोलिसांचा तपास सुरू; राजकीय सहभागाचा संशय
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वांद्रे परिसरात जवळपास चार हजार ६८३ बनावट प्रतिज्ञापत्र सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यात बनावट स्टॅम्पचा वापर करण्यात आला असून, याप्रकरणी निर्मलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत तपास सुरू आहे.
तक्रारदार हे घर खरेदीच्या काही कागदपत्रांसाठी ते वांद्रे कोर्ट परिसरात गेले होते. तेव्हा त्यांना ए के मार्ग परिसरात अर्चिज गॅलरी दुकानासमोर दोन नोटरी बसले होते. त्यांनी कुतूहलापोटी त्यांच्यासमोरील काही कागदपत्र उचलून पाहिली. तेव्हा स्टॅम्प पेपरच्या मागील बाजूस अटेस्टेड आणि त्याखाली स्टॅम्प मारून त्यात ते सह्या करत असल्याचे दिसले. त्यावर आधार कार्डची छायांकित प्रत आणि संबंधित कार्डधारकाचा फोटोही लावण्यात आला होता. मात्र, नोटरीसमोर प्रत्यक्षात कोणी व्यक्ती उभी नव्हती. त्यानंतर दोन दिवस त्याठिकाणी चकरा मारल्या असता तेव्हाही तेच काम सुरू होते. तेव्हा स्टॅम्प पेपरवर बनावटीकरण होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
असे होत होते काम
तक्रारदाराने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, नोटरीसमोर तीन व्यक्ती मदतनीस म्हणून बसल्या होत्या. ज्यात एकजण लाल शिक्का, तर दुसरा स्टॅम्प चिकटवत होता.
तिसऱ्याने हे सर्व स्टॅम्प पेपर गोळा केल्यावर त्यावर नोटरी सह्या करत होते. त्यानुसार ८ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांनी पुन्हा अर्चिज गॅलरीजवळ जात पाहणी केली. त्यावेळीदेखील तेच काम सुरू होते.
मी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक!
निर्मल नगर पोलीस ठाण्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जे एकूण स्टॅम्प पेपर हस्तगत करण्यात आले आहेत, त्यात फक्त तीन स्टॅम्प पेपर असे आढळले आहेत ज्यामध्ये संबंधित व्यक्तीचे नाव लिहीत त्यापुढे ‘मी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे’ असा मजकूर लिहिलेला आहे. त्यामुळे पोलीस याप्रकरणी राजकीय अंगानेही तपास करत आहेत.
कसून चौकशी, समाधानकारक उत्तरे नाहीत
या प्रकाराची माहिती तक्रारदाराने पोलिसांना दिल्यावर त्यांनी सोबत येत नोटरी आणि अन्य लोकांची चौकशी केली. मात्र, ते पोलिसांना याबाबत समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. त्यानंतर नोटरीकडे असलेली ४ हजार ६८२ प्रतिज्ञापत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० (फसवणूक), ४६५ (बनावटीकरण) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
शिंदे गटाचा ठाकरे गटावर आरोप
निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्रे सादर करण्यासाठी ठाकरे गटाकडून ही बनावट प्रतिज्ञापत्रे तयार करण्यात आल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे. हे सर्व ‘मातोश्री’च्या आशीर्वादाने सुरू असल्याचा आरोप करीत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही शिंदे गटाने केली आहे.
राजकीय सहभाग आहे का?
परिमंडळ ८ चे पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी व निर्मलनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील कडू यांनी तक्रारदाराचा जबाब नोंदविला असून, यात राजकीय सहभाग आहे का, हे पडताळून पाहिले जात आहे.