वारंवार प्रश्न विचारते म्हणून शिक्षिकेने टॉपर विद्यार्थिनीला केलं नापास, तिने पोलिसांत दिली तक्रार, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 05:52 PM2022-05-23T17:52:43+5:302022-05-23T17:53:20+5:30
Education News: छत्तीसगडमधील विलासपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील चपोरा गावातील हायस्कूलमध्ये ही घटना घडला आहे. वर्गात वारंवार प्रश्न विचारत राहते म्हणून शिक्षिकेने वर्गात अव्वल येणाऱ्या विद्यार्थिनीला प्रायोगिक परीक्षेमध्ये गैरहजर म्हणून नोंद केली.
रायपूर - छत्तीसगडमधील विलासपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील चपोरा गावातील हायस्कूलमध्ये ही घटना घडला आहे. वर्गात वारंवार प्रश्न विचारत राहते म्हणून शिक्षिकेने वर्गात अव्वल येणाऱ्या विद्यार्थिनीला प्रायोगिक परीक्षेमध्ये गैरहजर म्हणून नोंद केली. मात्र संपूर्ण परीक्षेमध्ये सदर विद्यार्थिनी उपस्थित होती. दहावीच्या बोर्डाचा निकाल लागल्यावर हा प्रकार समोर आला. तिला ६८ टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. मात्र प्रॅक्टिकल पेपरमध्ये गैरहजर नोंद केल्याने तिला नापास असा निकाल देण्यात आला आहे. मात्र सदर विद्यार्थिनी वर्गात टॉपर आहे.
चपोरा गावातील उच्च माध्यमित शाळेत शिकणाऱ्या जयंती साहू या सत्रामध्ये १०वीच्या बोर्डाच्या परीक्षेत बसली होती. इतर विद्यार्थी विद्यार्थिनींचाही निकाल समोर आला आहे. त्यामध्ये तिला गैरहजर राहिल्याने तिचा नापास असा निकाल दिला गेला. हा निकाल जेव्हा विद्यार्थिनीने पाहिला तेव्हा तिला धक्काच बसला. तिने गणिताच्या शिक्षिका प्रिया वाशिंग हिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
जयंतीच्या वडिलांनी शिक्षिकेसोबत याबाबत चर्चा केली तेव्हा त्यांनी जे काही सांगितलं ते ऐकून जयंतीच्या वडिलांना धक्का बसला. शिक्षिकेने सांगितले की, तुमची मुलगी वर्षभर वर्गात खूप प्रश्न विचारते, त्याची शिक्षा म्हणून तिला प्रायोगिक परीक्षेपमध्ये अनुपस्थित अशी नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी रतनपूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंद केली. मात्र याबाबत स्पष्टीकरण देताना शिक्षिकेने सांगितले की, जयंतीप्रमाणेच इतरही विद्यार्थिनींचा निकाल वाईट लागला आहे.
दुसरीकडे रतनपूर ठाण्यामध्ये विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे. तसेच तपास सुरू आहे. जयंतीला या परीक्षेत ६८ टक्के गुण मिळाले आहेत. मात्र शिक्षिकेच्या उदासिनतेमुळे ती नापास झाली असून, तिचं एक वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे.