लग्न मान्य नव्हते म्हणून बापानेच मुलीला संपवले; अखेर आयुषीच्या हत्येचा उलगडा झाला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 09:31 AM2022-11-22T09:31:30+5:302022-11-22T09:32:04+5:30
पोलिसांनी सांगितले की, चौकशीदरम्यान आईवडील ढसाढसा रडत होते. वडिलांनी सांगितले की, मुलगी अपमान करत असे. समजावून सांगितले; पण ती मान्य करत नव्हती.
मथुरा : येथे लाल सुटकेसमध्ये सापडलेल्या आयुषीची हत्या तिचे वडील नितेश यादव यांनी आईच्या मदतीने केल्याचे समोर आले आहे. वडील नितेश यांनी तिच्या छातीवर दोनदा गोळी झाडली. यानंतर मृतदेह दिल्लीतील बदरपूर येथील घरात बराच वेळ ठेवण्यात आला होता. त्यानंतर मृतदेह लाल रंगाच्या सुटकेसमध्ये बांधून १५० किमी दूर मथुरा जिल्ह्यातील यमुना एक्स्प्रेस वेवर फेकला. या प्रकरणात पोलिसांनी आई-वडिलांना अटक केली आहे.
आयुषीचे भरतपूर येथील छत्रपाल नावाच्या मुलाशी प्रेमसंबंध होते. दोघांनी वर्षभरापूर्वी एका मंदिरात लग्न केले होते. मात्र, आयुषी तिच्या आई-वडिलांच्या घरी राहत होती. आयुषीचे पालक लग्नाच्या विरोधात होते. १७ नोव्हेंबर रोजी दुपारी आयुषीचे तिच्या आईसोबत भांडण झाले. याबाबत आईने वडिलांना माहिती दिली. त्यानंतर रागावलेले वडील घरी आले. त्यांनी आयुषीला समजावले. मात्र, ती मान्य करायला तयार नव्हती. यावेळी संतप्त झालेल्या वडिलांनी परवानाधारक रिव्हॉल्व्हरने तिच्या छातीत दोन गोळ्या झाडून तिची हत्या केली.
पालक ढसाढसा रडले -
पोलिसांनी सांगितले की, चौकशीदरम्यान आईवडील ढसाढसा रडत होते. वडिलांनी सांगितले की, मुलगी अपमान करत असे. समजावून सांगितले; पण ती मान्य करत नव्हती.
नीटमध्ये उत्तीर्ण
चौकशीदरम्यान आयुषीने नीट परीक्षा उत्तीर्ण केल्याचेही समोर आले. मात्र, ती समुपदेशनासाठी गेली नाही. समुपदेशनाला उपस्थित राहण्यासाठी पालकांनी खूप समजूत घातली होती.
एक फोन कॉल आणि...
दिल्लीहून मथुरा पोलिसांना एक फोन आला. यामध्ये सुटकेसमध्ये सापडलेल्या मुलीच्या कुटुंबीयांची माहिती देण्यात आली.