Asaram Bapu Rape Case: २२ वर्षांनी न्याय! महिला शिष्यांवर बलात्कार, आसाराम बापू दोषी; सहा आरोपी निर्दोष
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 07:15 PM2023-01-30T19:15:08+5:302023-01-30T19:15:21+5:30
2001 मध्ये सुरतच्या दोन मुलींवर आसाराम बापूने बलात्कार केला होता. या प्रकरणी २०१३ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अहमदाबाद : सुरत बलात्कार प्रकरणात न्यायालयाने कथित संत आसामार बापूला दोषी ठरविले आहे. 10 वर्षे जुन्या खटल्याची सुनावणीवर आता निकाल येणार आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता आसारामला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
2001 मध्ये सुरतच्या दोन मुलींवर आसाराम बापूने बलात्कार केला होता. या प्रकरणी २०१३ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयाने एकूण 68 जणांचे जबाब नोंदवले. या प्रकरणी एकूण सात जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायालयाने सहा आरोपींना निर्दोष ठरवत आसारामला दोषी ठरवले.
गांधीनगर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान आसारामला व्हर्च्युअली हजर करण्यात आले होते. या प्रकरणात आसारामवर सुरतच्या दोन मुलींनी बलात्काराचा आरोप केला होता. न्यायालयाने प्रदीर्घ सुनावणीनंतर आरोप योग्य ठरवले आणि आसारामला दोषी ठरवले. त्या मुलींच्या लहान बहीणीने आसारामचा मुलगा नारायण साई याच्यावर बलात्काराचा आरोप केला होता.
आसाराम व्यतिरिक्त त्याची पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती आणि चार महिला अनुयायांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आसाराम सध्या जोधपूर तुरुंगात आहे. 2018 मध्ये, जोधपूर कोर्टाने त्याला 16 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. यानंतर आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.