आश्रमशाळेतील मुलीवर माजी विद्यार्थ्याकडून सलग पाच दिवस अत्याचार; आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 04:33 PM2020-03-11T16:33:11+5:302020-03-11T16:38:38+5:30
शाळेच्या अधीक्षक व मुख्याध्यापकांना विद्यार्थिनीने खोटे कारण सांगून सुट्टी मागितली.
अमरावती: तालुक्यातील एका शासकीय निवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनीला तेथील माजी विद्यार्थ्याने फूस लावून पळवून नेले आणि तिच्यावर सलग पाच दिवस बलात्कार केला. वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. यामुळे पुन्हा एकदा आश्रमशाळांतील मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
पोलीस सूत्रांनुसार, धारणी एकात्मिक प्रकल्प कार्यालय अंतर्गत असलेल्या तालुक्यातील एका शासकीय आश्रमशाळेत बारावीच्या विद्यार्थिनीशी माजी विद्यार्थ्याने लग्नाचे आमिष देऊन प्रेमसंबंध प्रस्थापित केले. तो गतवर्षी त्याच आश्रमशाळेत बारावीला होता. त्याने ३ मार्च रोजी विद्यार्थिनीला बाहेर फिरायला, खरेदी करायला जाऊ, असे सांगून शाळेतून सुट्टी घ्यायला लावली.
शाळेच्या अधीक्षक व मुख्याध्यापकांना विद्यार्थिनीने खोटे कारण सांगून सुट्टी मागितली. ते दोघे मध्यप्रदेशातील एका गावात पळून नेले. तेथे तिच्यावर ९ मार्चपर्यंत अत्याचार केल्यानंतर जिवे मारण्याची धमकी देत तिला गप्प केले. धारणी पोलिसांनी याप्रकरणी आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३६३, ३६६, ३७६ (२) (ठ), ५०६ सहकलम ४, १२ बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक एल.के. मोहंदुले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक माया वैश्य तपास करीत आहेत.