अश्विनी बिद्रे प्रकरण: हवालदार विजय सोनावणे यांची कुरुंदकरच्या विरोधात साक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 07:38 AM2021-01-30T07:38:16+5:302021-01-30T07:38:42+5:30
पुढील सुनावणी १२ फेब्रुवारीला होणार, त्याच्या मागणीनुसार या दोन्ही वस्तू मी त्याला आणून दिल्या होत्या. बॅटरी दीड हजार रुपयांना घेतली होती, अशी साक्ष पोलीस हवालदार विजय सोनावणे यांनी दिली.
पनवेल : अश्विनी बिद्रे हत्याकांडातील प्रमुख आरोपी अभय कुरुंदकर याने सतूर (मोठा कोयता) आणि मोठी बॅटरी आणण्यासाठी आपल्यावर जबरदस्ती केली होती. त्यानंतर या दोन्ही वस्तू आपण त्याला आणून दिल्या, अशी साक्ष पोलीस हवालदार विजय सोनावणे यांनी पनवेल जिल्हा सत्र न्यायालयात शुक्रवारी दिली.
हाच सतूर कुरुंदकरने अश्विनी यांच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी वापरला होता. पनवेल जिल्हा सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांच्या न्यायालयात शुक्रवारी अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी तीन साक्षीदारांची सर तपासणी घेण्यात आली. आजच्या साक्षीदारांमध्ये पोलीस हवालदार विजय सोनवणे, धनाजी इंगळे आणि निवृत्ती कर्डेल यांचा समावेश होता. अश्विनी बिद्रे यांची ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी मी रजेवर होतो. मात्र, गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार विजय सोनवणे याने मी हजर आहे असे दाखवून त्यावर कुरुंदकरने स्वाक्षरी केली होती, असा गौप्यस्फोट कुरुंदकरचा शासकीय चालक पोलीस हवालदार धनाजी इंगळे यांनी शुक्रवारी न्यायालयात केला. ११ एप्रिल २०१६ च्या रात्री कुरुंदकर याने मटण कापण्याचा सतूर (मोठा कोयता) आणि लांब फोकस जाईल अशी बॅटरी आणण्यास मला सांगितले होते. त्याच्या मागणीनुसार या दोन्ही वस्तू मी त्याला आणून दिल्या होत्या. बॅटरी दीड हजार रुपयांना घेतली होती, अशी साक्ष पोलीस हवालदार विजय सोनावणे यांनी दिली.
या दोन्ही साक्षींमुळे कुरुंदकरच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. साक्षीदारांची सर तपासणी विशेष सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत
यांनी घेतली. यावेळी न्यायालयामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता अल्फान्सो, विनोद चव्हाण, अश्विनी यांचे पती राजू गोरे,
आदी उपस्थित होते. पुढील सुनावणी येत्या १२ फेब्रुवारीला होणार आहे.
केस वर्षभरात संपविण्याचे आदेश
ही केस वर्षभरात संपविण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. अश्विनी बिद्रे गायब होण्यामागे वरिष्ठ पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांचा हात असल्याचा आरोप आहे. त्यामुळे मागील सुनावणीदरम्यान हत्येच्या वेळी कुरुंदकर नेमके कुठे होते? याबाबतचे प्रश्न उपस्थित केले गेले.