आसिफ खान हत्याकांड; मृतदेह न आढळताही दाखल होऊ शकतो हत्येचा गुन्हा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 01:47 PM2018-08-22T13:47:04+5:302018-08-22T13:52:03+5:30
मृतदेह आढळला नसला तरीही संशयित परिस्थितीजन्य ठोस पुरावा व आरोपींच्या कबुलीजबाबावरून हत्येचा गुन्हा दाखल क रून न्यायालयात खटला चालविता येऊ शकतो, अशी माहिती ज्येष्ठ विधिज्ञांनी दिली.
- सचिन राऊत
अकोला : वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप-बमसंचे नेते आसीफ खान मुस्तफा खान अपहरण प्रकरणानंतर त्यांची हत्या झाल्याची अकोला पोलिसांना खात्री पटताच तसेच आरोपींच्या कबुलीजबाबावरून खान यांची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले; मात्र त्यांच्या अपहरणाला सहा दिवसांचा कालावधी उलटल्यावरही मृतदेह आढळला नसल्यामुळे हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही; परंतु मृतदेह आढळला नसला तरीही संशयित परिस्थितीजन्य ठोस पुरावा व आरोपींच्या कबुलीजबाबावरून हत्येचा गुन्हा दाखल क रून न्यायालयात खटला चालविता येऊ शकतो, अशी माहिती ज्येष्ठ विधिज्ञांनी दिली.
वाडेगाव येथील रहिवासी आसीफ खान हे १६ आॅगस्ट रोजी रात्री मूर्तिजापूर येथे ज्योती गणेशपुरे यांच्या बहिणीकडे गेले होते. ज्योतीने बोलाविल्यानंतर आसीफ खान तिथे गेल्याचे पोलीस तपासात समोर येताच मूर्तिजापूर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध घातपाताच्या उद्देशाने अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला; मात्र मृतदेह पूर्णा नदी पात्रात फेकल्यानंतर सहा दिवसांचा कालावधी उलटला आहे. विविध पथकांसह पोलिसांद्वारे या मृतदेहाची शोधमोहीम सुरू आहे; मात्र मृतदेहच आढळत नसल्याने पोलिसांसमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. असे असले तरीही आरोपींचा कबुलीजबाब आणि संशयित परिस्थितीजन्य ठोस पुरावे गोळा करताच पोलिसांना या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करता येतो, अशी माहिती सेवानिवृत्त पोलीस अधिकारी तसेच ज्येष्ठ विधिज्ञांनी दिली. ठोस पुरावे गोळा करताच हा खटला न्यायालयातही तेवढ्याच ताकदीने चालविण्यात येतो, अशी माहितीही समोर आली आहे. त्यामुळे आता या तपासात अकोला पोलिसांचा चांगलाच कस लागणार असून, त्यांच्या तपासावरच या खटल्याचे भविष्य अवलंबून आहे.