उधारी दिलेले पैसे मागितले, वादातून आई- मुलाकडून महिलेची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 07:06 PM2022-04-10T19:06:31+5:302022-04-10T19:07:40+5:30
Murder Case : कबुलीसाठी आरोपीने पोलीस ठाण्याआधी कारागृह गाठले
कल्याण: मित्राला दिलेल्या उधारीचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या महिलेची मित्राच्या आई आणि भावाने चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्वेतील चककीनाका शास्त्रीनगरमध्ये शनिवारी रात्री घडली. रंजना राजेश जैसवार असे मृत महिलेचे नाव असून याप्रकरणी लालसादेवी आणि विजय राजभर या आई मुलावर कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हत्या केल्यानंतर दोघेजण घराला कुलूप लावून निघून गेले होते. मात्र रविवारी सकाळी ७ वाजता विजय हा स्वत: पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने हत्येची कबुली दिली. तत्पुर्वी तो माहीती देण्यासाठी आधारवाडी कारागृहाच्या ठिकाणी गेला होता.
रंजना ही कुटुंबासमवेत पूर्वेकडील चककीनाका परिसरात राहायची. तिचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय होता. याच परिसरात राहणा-या अजय अनंतलाल राजभर सोबत रंजनाची मैत्री होती. तीने अजयला 1 लाख रूपये उधार दिले होते. पैसे घेऊन बराच कालावधी झाला मात्र अजय पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. रंजना अजयच्या थेट घरी जाऊन पैसे मागत होती त्यामुळे अजयच्या घरच्यांबरोबर देखील तीचे वाद व्हायचे. शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास रंजना ही अजयच्या घरी गेली परंतू तो घरी नव्हता तीने अजयचा छोटा भाऊ विजय आणि त्याची आई लालसादेवी हिच्याकडे पैशासाठी तगादा लावला. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. यावेळी संतापलेल्या विजय आणि लालसादेवीने घरातील चाकूने तीच्यावर सपासप वार केले. यात रंजना गंभीर जखमी झाल्याने तीचा जागीच मृत्यू झाला. तीचे पती राजेश यांच्या तक्रारीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
आधी त्याने गाठले होते आधारवाडी कारागृह
धक्कादायक बाब म्हणजे तीची हत्या केल्यानंतर तीचा मृतदेह घरातच ठेवला आणि दरवाजाला बाहेरून कुलूप लावून दोघेजण कुलूप लावून तेथून निघून गेले होते. रविवारी सकाळी विजय कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गेला त्याने घडलेल्या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली. तत्पुर्वी त्याने आधारवाडी कारागृह गाठले होते आणि तेथील पोलिसांना त्याने हत्या केल्याची माहीती दिली. मात्र तेथील पोलिसांनी त्याला कोळसेवाडी पोलिस ठाण्यात जायला सांगितले. विजयने दिलेल्या माहीतीवरून कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करीत विजयला ताब्यात घेतले. लालसादेवीचा शोध सुरू आहे.