स्मार्टफोनसाठी २५ हजार मागितले, नकार मिळाल्यानं मुलाकडून आईला काठीनं बेदम मारहाण अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 01:59 PM2022-12-21T13:59:49+5:302022-12-21T14:01:32+5:30
माणूस इतका इतका क्रूर कसा असू शकतो असा प्रश्न पडावा अशा पद्धतीनं नराधम मुलानं स्वत:च्याच आईला बेदम मारहाण केली.
ज्या लेकराला आई नऊ महिने आपल्या गर्भात वाढवते आणि जगात आल्यावर बोट धरून चालायला शिकवते, अपार कष्ट घेते त्याच आईला मुलानं फक्त मोबाईल दिला नाही म्हणून बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. माणूस इतका इतका क्रूर कसा असू शकतो असा प्रश्न पडावा अशा पद्धतीनं नराधम मुलानं स्वत:च्याच आईला बेदम मारहाण केली. मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. महागडा मोबाईल घेण्याच्या हव्यासापोटी एका मुलानं आपल्याच आईला काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे आईच्या हाताला आणि पायाला जबर दुखापत झाली. यासोबतच आईची रडून-रडून खूप वाईट अवस्था झाली आहे.
छिंदवाडा येथील पारसिया पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बडकुही चौकी परिसरातील दरबाई गावात राहणाऱ्या फुलवतीबाई यांना तिचा मुलगा विनोद याने मोबाईल घेण्यासाठी २५ हजार रुपये मागितले होते. कसेबसे आईने त्याला १५ हजार रुपये दिले आणि तेवढ्यातच मोबाईल घे असं सांगितलं. विनोदला २५ हजार रुपये न मिळाल्याने राग आला आणि त्याने आईने दिलेले १५ हजार रुपये जमिनीवर फेकून दिले. काठीनं बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
यानंतर जखमी वृद्ध आईला रुग्णवाहिकेच्या सहाय्यानं पारसिया येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आलं. मुलाच्या मारहाणीमुळे आईच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे. रुग्णालयात जखमी आई फुलवतीबाई पती रमेश यादव यांच्या बाजूला बसून सतत रडत होत्या. घटनेची माहिती मिळताच महिलेच्या मुली आणि इतर नातेवाईकही रुग्णालयात पोहोचले. महिलेचा पती रमेश यादव याने सांगितले की, मोबाईल घेण्यासाठी पैसे हवेत म्हणून मुलाने आईला काठीनं बेदम मारहाण केली.
रुग्णालयात उपस्थित नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा पती कोळसा खाणीत काम करायचा आणि ते आता निवृत्त झाले आहेत. पेन्शनच्या रकमेतूनच घरखर्च भागवावा लागतो. त्यांची दोन्ही मुलं पैशासाठी आई आणि वडील दोघांशी भांडत राहतात. मुलीनं सांगितले की, मुलाच्या जाचाला कंटाळून आई-वडिलांना सासरच्या घरी राहायला बोलावलं होतं, मात्र मुलीच्या सासरी राहणं बरोबर नाही म्हणून ते घरीच राहून मुलाचा त्रास सहन करत होते. याआधीही एकदा मारहाणीमुळे दुखापत होऊन आईने विष प्राशन केलं होतं. मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून आईला मारहाण करणारा विनोद काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून सुटल्याचं सांगण्यात येत आहे.