विद्यार्थ्यांना शौचालय स्वच्छ करण्यास सांगितले; मुख्याध्यापिका निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 07:54 AM2021-12-20T07:54:22+5:302021-12-20T07:54:57+5:30
मंगलम पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली.
चेन्नई : तामिळनाडूत तिरुपूरतील इदुवाई खेड्यात सरकारी शाळेची मुख्याध्यापिका गीता (४५) हिला निलंबित करण्यात आले आहे. विशिष्ट जातीमुळे आम्हाला स्वच्छतागृह साफ करावे लागले, असा आरोप अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी या मुख्याध्यापिकेवर केला होता.
या शाळेला मुख्य शिक्षण अधिकारी आर.रमेश यांनी भेट दिली, तेव्हा ९वी आणि १०वीच्या वर्गातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी आम्हाला मारहाण झाली व स्वच्छतागृहे आणि पाण्याच्या टाक्या स्वच्छ कराव्या लागल्या, असे आरोप मुख्याध्यापिकेवर केले. गीता या आमच्या जातीवरून शेरे मारतात आणि शाळेच्या देखरेखीसाठी आमच्याकडे पैसे मागतात, असेही त्यांचे आरोप होते. विद्यार्थ्यांच्या तक्रारी नोंदवून घेतल्यानंतर गीता हिला निलंबित करण्यात आले आणि मंगलम पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली.