"काकी, बलात्कार म्हणजे काय?"; गँगरेपच्या २ दिवस आधीच मुलीने विचारला होता प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 03:05 PM2024-08-26T15:05:33+5:302024-08-26T15:09:42+5:30

२२ ऑगस्ट रोजी ट्यूशनवरून परतत असताना १४ वर्षीय पीडितेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

assam gang rape victim asked aunt home what is rape 14 year old girl gang rape two days later | "काकी, बलात्कार म्हणजे काय?"; गँगरेपच्या २ दिवस आधीच मुलीने विचारला होता प्रश्न

"काकी, बलात्कार म्हणजे काय?"; गँगरेपच्या २ दिवस आधीच मुलीने विचारला होता प्रश्न

आसाममध्ये २२ ऑगस्ट रोजी ट्यूशनवरून परतत असताना १४ वर्षीय पीडितेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलगी तिच्या घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असताना ही घटना घडली. या घृणास्पद घटनेने अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. तसेच या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

मुलगी आपली काकी आणि आजी-आजोबांसोबत राहते. डीएसपी होण्याचं तिचं स्वप्न आहे. काकी मुलीची खूप काळजी घ्यायची. त्यांची आर्थिक परिस्थिती वाईट होती. पण त्यांनी आपल्या मुलीला शिकवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला होता. काकीवर कुटुंबाची जबाबदारी होती. तसेच मुलीला शिकवून मोठं करण्याचं काकीचं स्वप्न होतं. पण मुलीसोबत घडलेल्या घटनेने सर्वच जण हादरले आहेत. 

२२ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास तीन जणांनी निष्पाप मुलीवर हल्ला करून सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. जखमी अवस्थेत तिला जंगलात सोडण्यात आलं. स्थानिक रहिवाशांनी मुलीला शोधून रुग्णालयात नेलं, तेथून नंतर तिला उपचारासाठी नागाव वैद्यकीय महाविद्यालयात रेफर करण्यात आले. या घटनेनंतर आसाममध्ये निदर्शने झाली.

मुलीची काकी आपल्या मुलीला न्याय देण्याची मागणी करत आहे. इंडिया टुडे एनईशी बोलताना काकी म्हणाली की, माझं मन दु:खी झालं आहे. इतकं भयंकर काहीतरी घडेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. तिचं संरक्षण करण्यात मी अयशस्वी ठरले. त्या दिवशी तिला सायकलने ट्यूशनला जायचं होतं, कारण ई-रिक्षा नव्हती. मुलीने दोन दिवसांपूर्वी काकी, बलात्कार म्हणजे काय? असा प्रश्न विचारला होता. कारण तिला कोलकाता येथील कोलकाता निर्भया बलात्कार-हत्या प्रकरणाची माहिती मिळाली होती.

या घटनेबाबत पीडितेच्या काकीने गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी केली असून अशा गुन्ह्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तिने सांगितलं की, मुलगी म्हणायची की एक दिवस ती पोलीस अधिकारी (डीएसपी) होईल. दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली असून मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पीडितेच्या सुरक्षिततेसाठी आणि शिक्षणासाठी आवश्यक मदत करण्यासाठी पुढे यावं, असं आवाहन केलं आहे.
 

Web Title: assam gang rape victim asked aunt home what is rape 14 year old girl gang rape two days later

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.