आई-वडिलांकडे तक्रार केल्याचा राग; 40 विद्यार्थ्यांचा गरोदर शिक्षिकेवर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 09:03 PM2022-11-30T21:03:52+5:302022-11-30T21:07:39+5:30
याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून, 22 विद्यार्थ्यांना निलंबित केले आहे.
गुवाहाटी: अनेकदा विद्यार्थ्यांनी शिक्षकांशी गैरवर्तन केल्याच्या बातम्या येत असतात. असाच एक प्रकार आसामच्या दिब्रुगड जिल्ह्यातून समोर आला आहे. पण, या वेळेस विद्यार्थ्यांनी हद्दच केली. विद्यार्थ्यांच्या टोळक्याने 5 महिन्यांच्या गरोदर शिक्षिकेवर हल्ला केला. याचे कारण म्हणजे, शिक्षिकेने विद्यार्थ्यांच्या पालकांकडे अभ्यास करत नसल्याची तक्रार केली होती.
विद्यार्थी शाळेतून निलंबित
या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी कारवाई करत विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. 22 विद्यार्थ्यांना शाळेतून निलंबित करण्यात आले आहे. हे प्रकरण जवाहर नवोदय विद्यालयाशी संबंधित आहे. शाळेचे उपप्राचार्य रतीश कुमार यांनी सांगितले की, रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. शाळेत शिक्षक पालकांची बैठक होती, विद्यार्थ्यांचे पालक आले होते. यादरम्यान 22 विद्यार्थ्यांच्या खराब कामगिरीची तक्रार इतिहासाच्या शिक्षिकेने त्यांच्या पालकांकडे केली.
40-50 विद्यार्थ्यांनी घेराव घातला
रविवारी संध्याकाळी सुमारे 40-50 विद्यार्थ्यांच्या जमावाने पाच महिन्यांच्या गरोदर शिक्षिकेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मुख्याध्यापक रतीश कुमार यांनी सांगितले की, जेव्हा शिक्षिकेला विद्यार्थ्यांनी घेरले तेव्हा ती बेशुद्ध पडली आणि तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. नंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला.
सर्व 10वी आणि 12वीचे विद्यार्थी
दोन विद्यार्थी मुख्य दोषी होते, त्यांनी 40-50 विद्यार्थी एकत्र केले. बहुतेक विद्यार्थी इयत्ता दहावी आणि बारावीचे होते. सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकाला घेरले आणि तिच्यावर अश्लील शेरेबाजी केली, तसेच मारहाण करण्याचा प्रयत्न केला. दिब्रुगडचे जिल्हा दंडाधिकारी विश्वजित पेगू यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.