उत्तर प्रदेशच्या दोन गोतस्कर भावांचा आसाममध्ये एन्काऊंटर; तब्बल ३०० कोटींचे होते मालक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 01:06 PM2022-04-20T13:06:11+5:302022-04-20T13:07:48+5:30
प्रचंड दहशत असलेल्या दोन गोतस्कर भावांचा पोलिसांकडून एन्काऊंटर; एकावर होतं २ लाखांचं बक्षीस
गुवाहाटी: उत्तर प्रदेशातील दोन गोतस्कर भावांचा आसाममध्ये एन्काऊंटर करण्यात आला आहे. दोघे मेरठचे रहिवासी होते. १३ एप्रिलला दोघांना अटक झाली. त्यानंतर आसाम पोलिसांनी त्यांचा ताबा घेतला. १४ एप्रिलला त्यांना आसामच्या कोकराझारमध्ये आणण्यात आलं. एन्काऊंटर दरम्यान चार पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
अकबर बंजारा आणि सलमान अशी एन्काऊंटरमध्ये ठार करण्यात आलेल्या गोतस्करांची नावं आहेत. अकबर बंजारावर २ लाख रुपयांचं बक्षीस होतं. उत्तर प्रदेश पोलिसांकडून ताबा घेतल्यानंतर आसाम पोलिसांनी दोन्ही गोतस्करांना न्यायालयात हजर केलं. न्यायालयानं त्यांना सात दिवसांची कोठडी सुनावली. अकबर बंजारा आणि सलमान मंगळवारी पोलीस कोठडीतून फरार झाले. त्यानंतर पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं.
कोकराझारमध्ये गोतस्कर आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन्ही तस्कर मारले गेले. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. अकबरनं तस्करीच्या उद्योगाचा विस्तार आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, मिझोरमपर्यंत केला होता. बंद ट्रकमधून बांगलादेशच्या सीमेपर्यंत गोवंश पोहोचवण्यात यायचे. अकबर बंजारा आणि त्याचा भाऊ सलमाननं गोमांस तस्करीतून मेरठ, बिजनोर आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये ३०० कोटींची संपत्ती गोळा केली.
अकबर बंजाराची उत्तर प्रदेशातील फलावदा परिसरात दहशत होती. त्यांच्या गुंडगिरीमुळे अनेक जण त्रासले होते. योगी सरकार आल्यानंतरही अकबरचा गोमांस तस्करीचा व्यवसाय सुरुच होता. अकबरला नेमकं कोणाचं संरक्षण होतं याचा तपास सुरू आहे. अकबरच्या संपत्तीची माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी आयकर विभागाला पत्र लिहिलं होतं.