आसिफ खान यांची हत्याच; वाशिमच्या माजी जि. प. अध्यक्षासह तिघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 02:07 PM2018-08-21T14:07:40+5:302018-08-21T14:11:58+5:30
अकोला : वाडेगावचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य आसिफ खान मुस्तफा खान यांची वाशिम जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षाज्योती अनिल गणेशपुरे, त्यांचा पुत्र वैभव गणेशपुरे व त्याचा मावसभाऊ स्वप्निल वानखडे या तिघांनी गळा आवळून हत्या केल्याची कबुली दिली.
अकोला : वाडेगावचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य आसिफ खान मुस्तफा खान यांची वाशिम जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तथा विद्यमान महिला व बालकल्याण सभापती ज्योती अनिल गणेशपुरे, त्यांचा पुत्र वैभव गणेशपुरे व त्याचा मावसभाऊ स्वप्निल वानखडे या तिघांनी गळा आवळून हत्या केल्याची कबुली पोलिसांसमोर दिल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक कैलास नागरे यांनी दिली. गणेशपुरे हिने आसिफ खान यांना घरी बोलावून त्यांची हत्या करताना त्यांच्यात झटापट झाली असता, यामध्ये ज्योती यांच्या गालावर धारदार शस्त्राचा वार झाला, तर त्यांचा मुलगाही या झटापटीत जखमी झाल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
आसिफ खान १६ आॅगस्ट रोजी बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा मुलगा डॉ. सोहेल खान याने बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या प्रकरणात पोलिसांनी चौकशी सुरू केली असून, त्यांचे अपहरण झाल्याचे निश्चित होताच सोमवारी पाच जणांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. मात्र, याच दरम्यान ज्योती गणेशपुरे व त्यांचा मुलगा वैभव गणेशपुरे व स्वप्निल वानखडे या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी हत्येची कबुली दिली. सोमवारी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत या तिघांचीही चौकशी केली असता त्यांनी कबुली देताच स्थानिक गुन्हे शाखेने तीनही आरोपींना अटक केली. या प्रकरणात आणखी दोन ते तीन आरोपींचा समावेश असून, पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत. ज्योती गणेशपुरे व आसिफ खान या दोघांमध्ये संपत्ती व आर्थिक बाबीवरून वाद सुरू झाले होते. दोघांमधील वाद विकोपाला गेल्यानंतर ज्योती गणेशपुरे हिने आसिफ खान यांना १६ आॅगस्टच्या रात्री मूर्तिजापूर येथील बहिणीच्या घरी बोलावले. त्यानंतर संगनमताने खान यांची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर एम एच ३७ ए १५८७ क्रमांकाच्या वाहनातून आसीफ खान यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी सदर वाहनात मृतदेह टाकून म्हैसांग येथील पूर्णा नदीपात्रात फेकल्याची कुबली पोलिसांना दिली आहे. तीन दिवसांपासून मृतदेहाचा शोध घेण्यात येत आहे, मात्र घटनेच्या रात्री नदीला प्रचंड पूर असल्याने मृतदेह दूरवर वाहून गेल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणात लवकरच हत्येचा गुन्हा दाखल करण्यात येणार असून, अटक केलेल्या तीनही आरोपींना मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे पोलीस अधिकाºयांनी सांगितले.