शाळेची माहिती मागवल्याने मारहाण; दिवा येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2022 07:24 PM2022-09-21T19:24:57+5:302022-09-21T19:25:08+5:30
शिक्षक व विद्यार्थी यांच्या समस्यांवर काम करणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष व मुंबईच्या एका शाळेचे मुख्याध्यापक धुरंधर सिंह यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : माहिती अधिकारातून शाळेची माहिती मागवल्याने मुंबईच्या एका शाळेच्या मुख्याध्यापकांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. अर्जावर सुनावणीच्या बहाण्याने त्यांना दिवा येथील शाळेत बोलावून हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी त्यांनी पोलिसांकडे दिलेल्या अर्जावर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्षक व विद्यार्थी यांच्या समस्यांवर काम करणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष व मुंबईच्या एका शाळेचे मुख्याध्यापक धुरंधर सिंह यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. त्यांनी दिवा येथील एका शाळेची माहिती अधिकारातून माहिती मागवली होती. यावर सुनावणीसाठी त्यांना गतमहिन्यात दिवा येथील शाळेत बोलवण्यात आले होते. त्यानुसार ते शाळेत आले असता मुख्याध्यापकांच्या दालनाबाहेर उभ्या असलेल्या दोघांनी त्यांना एका वर्गात नेवून मारहाण केली. त्यांच्या तावडीतून सुटका करून घेतल्यानंतर जखमी अवस्थेत ते रबाळे पोलीस ठाण्यात गेले होते. परंतु जखमी असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर ते थेट घरी गेल्यानंतर त्यांनी घडलेल्या प्रकरणाबाबत पोलिसांकडे तक्रार अर्ज केला होता. त्याद्वारे सोमवारी रबाळे पोलीस ठाण्यात मुन्ना यादव व राममूर्ती यादव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.