खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा प्राणघातक हल्ला; बचावासाठी पोलिसाचा गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 09:13 PM2022-06-02T21:13:22+5:302022-06-02T21:14:45+5:30
Firing Case : ताब्यात घेताना झाली झटापट : जिल्हा पोलीस अधीक्षकांची माहिती
लातूर : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस निरीक्षकावर बुधवारी मध्यरात्री लातूर शहरातील श्रीनगर परिसरात प्राणघातक हल्ला केला. दरम्यान, बचावासाठी पोलीस निरीक्षकाने आरोपीच्या दिशेने गोळीबार करून त्याला ताब्यात घेतले आहे. या झटापटीत पोलीस निरीक्षक जखमी झाले असून, आरोपीला गोळी लागली आहे. दोघांवरही शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी गुरुवारी आयोजित पत्रपरिषदेत दिली.
जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणाले, चाकूर पोलीस ठाण्यामध्ये तसेच अहमदपूर पोलीस ठाण्यात नारायण तुकाराम इरबतनवाड याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल आहे. चाकूर पोलिसात दाखल झालेल्या गुन्ह्यात तो प्रमुख आरोपी आहे. या खुनाच्या चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले होते. त्यावेळी पोलिसाच्या ताब्यातून नारायण इरबतनवाड फरार झाला होता. पोलीस त्याच्या मागावर होते. लातूर शहरातील श्रीनगर येथे तो आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते यांनी त्याच्या अटकेसाठी सापळा रचला.
तेथून निघून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला पकडले. यावेळी त्याने पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यांचा गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. गुप्तांगावर लाथ मारली. यात मोहिते यांना मुका मार लागला आहे. दरम्यान, बचावासाठी मोहिते यांनी पिस्टल काढून स्वत:चा जीव वाचविण्यासाठी स्वसंरक्षणासाठी पिस्टलने फायर केली. यात त्याच्या कमरेखाली गोळी लागली आहे. यावेळी चाकूर व एमआयडीसीचे पोलीस तेथे आले. त्यांनी पोलीस निरीक्षक मोहिते व आरोपी नारायण इरबतनवाड यांना रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मोहिते यांना रुग्णालयातून सुटी मिळाली असून, आरोपी इरबतनवाड याच्यावर उपचार सुरू असल्याचेही जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सांगितले.
मादक द्रव्याची विक्री करायचा...
जमिनीच्या वादात चाकूर व अहमदपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असलेला आरोपी नारायण इरबतनवाड हा मादक द्रव्याची विक्री करीत होता. त्याला यापूर्वी मिरज परिसरातील एका ढाब्यावरून ताब्यात घेताना पसार झाला होता. पोलीस त्याच्या अटकेसाठी चार महिन्यापासून परिश्रम करीत होते. त्याच्यावर अन्य ठिकाणी गुन्हे दाखल असण्याची शक्यता आहे. अन्य सात राज्यांमध्ये त्याचे नेटवर्क असल्याची माहिती आहे. याअनुषंगाने आता तपास होईल, असेही जिल्हा पोलीस अधीक्षक पिंगळे म्हणाले.