स्टेशनवर झोपलेल्या मुलीवर अत्याचार; जुईनगर स्थानकातून रेल्वे पोलिसांनी केली एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 09:22 AM2023-03-03T09:22:35+5:302023-03-03T09:22:53+5:30
मूळची जळगावची महिला रेल्वेने प्रवास करत असताना चुकून पनवेल स्थानकात आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : पनवेल रेल्वेस्थानकात प्लॅटफाॅर्मवर झोपलेल्या तीन वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी एकाला अटक केली असून तो कळंबोली पुलाखाली राहणारा बेघर आहे. मध्यरात्रीच्या सुमारास मुलीची आई लघुशंकेसाठी गेली असता काही मिनिटांमध्ये आरोपीने गैरकृत्य केले.
मूळची जळगावची महिला रेल्वेने प्रवास करत असताना चुकून पनवेल स्थानकात आली होती. यामुळे रात्र काढण्यासाठी ती तीन वर्षांच्या मुलीसोबत प्लॅटफाॅर्म क्रमांक एकवर झोपली होती. मध्यरात्री तीनच्या सुमारास महिला लघुशंकेसाठी गेली असता त्याठिकाणी मुलगी एकटीच झोपली होती. त्याचवेळी आलेल्या एका व्यक्तीने तिला उचलून स्थानकाच्या वाढीव बांधकामाच्या आडोशाला नेले. त्याने तिच्यावर अत्याचार करून पळ काढला होता.
रेल्वेस्थानकात गुन्हेगारांचा शिरकाव
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ निरीक्षक प्रवीण पाडवी यांनी विविध पथके तयार केली. दुपारच्या सुमारास रेल्वे सुरक्षा बलाचे जवान आनंदकुमार यांनी जुईनगर स्थानकातून एका संशयिताला ताब्यात घेतले.
अधिक चौकशीत त्याने पीडितेवर अत्याचार केल्याची कबुली दिली. तो कळंबोली पुलाखाली राहणारा असून रात्रीच्या वेळी सर्वत्र भटकत असतो. त्याच्या या कृत्याने रात्रीच्या वेळी रेल्वेस्थानकात गुन्हेगारांचा शिरकाव होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. त्याने अशी काही कृत्ये केली आहेत का, याचा तपास सुरू आहे.