सामाजिक कार्यकर्त्यावर दुचाकीवरून आलेल्या युवकांचा प्राणघातक हल्ला; नारायणगाव येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 10:11 PM2021-01-07T22:11:06+5:302021-01-07T22:11:27+5:30
हा हल्ला नारायणगाव येथील मोठी वर्दळ असलेल्या कोल्हेमळा चौकात झाला.
नारायणगाव : नारायणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संग्राम जगन्नाथ घोडेकर ( वय ५५ ) यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात युवकांनी कोयत्याने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले. हा हल्ला गुरुवारी ( दि . ७ ) रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास नारायणगाव येथील मोठी वर्दळ असलेल्या कोल्हेमळा चौकात झाला आहे . दरम्यान, घोडेकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना पुणे येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे .
संग्राम घोडेकर हे कोल्हेमळा येथील मधुकोश सोसायटीत राहत आहेत. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ते घरगुती गॅसची टाकी स्कुटीवर घेऊन जात होते . घरापासून काही अंतरावर असलेल्या कोल्हेमळा चौकात आले असताना दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात युवकांनी त्यांना थांबण्याचा इशारा केल्याने ते थांबले. त्याचवेळी दुचाकीवर मागे बसलेल्या दोन युवकांनी घोडेकर यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. कोयत्याचा वर्मी घाव डोक्यात बसल्याने घोडेकर हे खाली कोसळले . काही लोकांनी त्यांना नारायणगाव येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले . परंतु गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुणे येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे . संग्राम घोडेकर यांची पत्नी सौ . रत्ना घोडेकर यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्या फिर्यादीत स्थानिक एका जेष्ठ पुढारी आणि त्यांचा मुलगा यांची नावे दिली असल्याचे समजते. हा हल्ला रो – हाऊसच्या मालकी हक्क वादातून झाल्याचे फिर्यादीत नमूद केल्याचे समजते . मात्र पोलिसांनी अद्याप अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही .
नारायणगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांना परिसरातून सीसीटीव्हीचे फुटेज मिळाले असून हल्लेखोर हे १७ ते १८ वर्षाचे असावेत असे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे . हा हल्ला रो - हाऊसच्या मालकी हक्कावरून की जमीन खरेदी विक्रीच्या आर्थिक व्यवहारातुन किवा राजकीय संघर्षातून झाला आहे याचा तपास पोलीस करीत आहे .