पत्नी आणि सासऱ्यावर प्राणघातक हल्ला, आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 01:15 AM2020-07-11T01:15:34+5:302020-07-11T01:17:34+5:30
पत्नीची शेती आणि राहते घर आपल्या नावावर करून द्यावे म्हणून एका आरोपीने पत्नीला आणि सासऱ्याला लाकडी दांड्याने डोक्यावर मारून गंभीर जखमी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पत्नीची शेती आणि राहते घर आपल्या नावावर करून द्यावे म्हणून एका आरोपीने पत्नीला आणि सासऱ्याला लाकडी दांड्याने डोक्यावर मारून गंभीर जखमी केले. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री १० च्या सुमारास ही घटना घडली. विकी मंगल पाटोते (वय ३०) असे आरोपीचे नाव असून तो शांतिनगर इसासनी येथे राहतो. आरोपी विकीची पत्नी रविना लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये नोकरीला आहे. आरोपी विकी हा गुन्हेगारी वृत्तीचा आहे. पत्नीने शेती आणि राहते घर आपल्या नावावर करून द्यावे, यासाठी तो तिला अनेक दिवसापासून त्रास देत आहे. गुरुवारी रात्री १० च्या सुमारास त्याने याच कारणावरून पत्नीसोबत वाद सुरू केला. रविनाने वाद टाळण्यासाठी प्रयत्न केले. मात्र आरोपीने आक्रमक होऊन तिच्या डोक्यावर फावड्याच्या दांड्याने फटका मारला. ती गंभीर जखमी झाल्याचे पाहून तिचे वडील गणपतराव मुलीच्या मदतीला धावले असता आरोपीने त्यांचेही डोक्यावर लाकडी दांड्याने मारून गंभीर जखमी केले. आरडाओरडा ऐकून आजूबाजूची मंडळी धावली. त्यांनी आरोपीला पकडले. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन आरोपी विकी पाटोते याला अटक केली. पुढील तपास सुरू आहे.
दोघांनी लावला गळफास
शहरातील विविध भागात दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली. कामठी मार्गावरील टेका नाका परिसरात राहणारे सुरेश राजेंद्र खोब्रागडे (वय ५५) यांनी ग्रामीण आरटीओ ऑफिसच्या मागे असलेल्या झुडपी जंगलात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी रात्री १० च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मिळालेल्या माहितीवरून कपिल नगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे. आत्महत्येची दुसरी घटना मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. झिंगाबाई टाकळी जुनी वस्तीतील झेंडा चौकात राहणाऱ्या आशाबाई अशोक आंबाडरे (वय ४७) यांनी शुक्रवारी सकाळी गळफास लावून आत्महत्या केली. त्यांचा मुलगा आशिष यांनी दिलेल्या सूचनेवरून मानकापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. आशाबाईच्या आत्महत्येमागील कारण जाणून घेतले जात आहे.