क्षुल्लक कारणावरुन रहिवाशाला मारहाण; अखेर हसमुख शहा पोलिसांना आला शरण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 05:12 PM2019-09-18T17:12:20+5:302019-09-18T17:13:53+5:30
स्वत: नौपाडा पोलीस ठाण्यात हजेरी लावल्यानंतर त्यांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.
ठाणे - नौपाडयाच्या विष्णुनगर भागातील रहिवाशी राहूल पैठणकर यांना क्षुल्लक कारणावरुन जबर मारहाण करणारे विकासक हसमुख शहा यांना अखेर नौपाडा पोलिसांनी बुधवारी सकाळी अटक केली आहे. त्यांनी स्वत: नौपाडा पोलीस ठाण्यात हजेरी लावल्यानंतर त्यांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.
पैठणकर आणि शहा वास्तव्यास असलेल्या विष्णुनगर येथील ‘सुयश’ सोसायटीत इमारतीची लिफ्ट पाचव्या मजल्यावरुन सहाव्या मजल्यावर येण्यास विलंब झाल्याने 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी झालेल्या वादातून शहा पिता पुत्रांनी पैठणकर यांना जबर मारहाण केली होती. याबाबतचा व्हिडीओ चार ते पाच दिवसांनी व्हायरल झाल्यानंतर नौपाडा पोलिसांनी याप्रकरणी कलम 341सह मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी शहा यांच्याविरुद्ध 16 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल केला होता. शहा यांनी मराठी घाटीचा उल्लेख करीत आक्षेपार्ह उद्गारही काढले होते. याचीच गंभीर दखल घेत मनसेच्या अविनाश जाधव यांनी शहा याला जाहीर माफीही मागायला भाग पाडले. तसेच शहा आणि पैठणकर यांच्यातील हा वैयक्तिक वाद असल्याचे गुजराती समाजाने एका पत्रकार परिषदेद्वारे मंगळवारी जाहीर केले. तोपर्यंत नौपाडा पोलीसही आपल्या मागावर असल्याची कुणकुण लागल्यामुळे शहा यांनी स्वत:च पोलिसांशी संपर्क साधून शरणागती पत्करली. त्यांची ठाणे न्यायालयाने वैयक्तिक जामीनावर सुटका केल्याची माहिती पोलिसांनी दिली.