पोलिस असल्याचे सांगून मुलीवर केला अत्याचार; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 08:50 AM2023-08-21T08:50:44+5:302023-08-21T08:51:46+5:30
आरोपी प्रशांत पाटीलला अटक, २३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी
लोकमत न्यूज नेटवर्क, वडखळ: मी पोलिस आहे असे धमकावून फिर्यादी पीडित तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी प्रशांत पाटील (मूळ रा. काळेश्री, पेण, सध्या राहणार रामवाडी, पेण ) याला पेण पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत अटक केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सतरा वर्षांची अल्पवयीन पीडित तरुणी आपल्या साक्षीदारासोबत ट्री हाऊस शाळेकडून पेणकडे येत होती. रिक्षा चालक प्रशांत पाटील याने पीडित तरुणी व साक्षीदार यांना जबरदस्तीने आपल्या रिक्षात बसवून त्यांचे मोबाइल काढून घेतले. त्यांना पेण खोपोली मार्गावरील धामणी येथील एका बंद पडलेल्या कंपनीत नेले. तेथे पीडित अल्पवयीन तरुणीला जबरदस्तीने प्रेग्नन्सी टेस्ट करायला सांगितली. मात्र तिने नकार दिल्यावर तिची अंतर्वस्त्रे काढून बळजबरीने तिची प्रेग्नन्सी टेस्ट केली. तसेच आपल्या मोबाइलवर अश्लील व्हिडीओ दाखवून अत्याचार केला.
या प्रकरणी पेण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील आरोपी प्रशांत पाटील याला अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असता २३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी शिवाजी फडतडे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या नेतृत्वाखाली महिला पोलिस सहायक निरीक्षक एम.जे. घाडगे या तपास अधिक करीत आहेत.