पाय दाबून देण्याचा बहाणा करत सावत्र मुलीवर अत्याचार; बापाला १० वर्षांची सक्त मजुरी, २५ हजारांचा दंड
By नितिन गव्हाळे | Published: June 16, 2023 05:54 PM2023-06-16T17:54:06+5:302023-06-16T17:54:45+5:30
या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक २ शयना पाटील यांनी १६ जून रोजी आरोपी वडिलांना १० वर्षे सक्तमजुरीचा कारावास यासह २५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.
अकोला : मावशीची प्रकृती बरी नसल्याने, तिच्या देखभालीसाठी पत्नीला भुसावळला पाठवून दिले. त्याच रात्री मद्य प्राशन करून आलेल्या वडिलांनी सावत्र मुलीला पाय दाबून देण्याचा बहाणा केला. मुलगी पाय दाबत असतानाच, वडिलांनी नात्याचा कोणताही विचार न करता, तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक २ शयना पाटील यांनी १६ जून रोजी आरोपी वडिलांना १० वर्षे सक्तमजुरीचा कारावास यासह २५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.
पीडित मुलीच्या आईने २१ सप्टेंबर २०१४ रोजी दिलेल्या तक्रारीनुसार २० सप्टेंबर २०१४ च्या रात्री आरोपी किशोर श्यामराव काळे (३५, रा. गीतानगर, एमराल्ड कॉलनी) याने पत्नीला सांगितले की, तिच्या बहिणीची तब्येत खराब आहे व तिच्या देखभालकरिता भुसावळला तुला जायचे आहे. त्यामुळे पीडितेची आई ही भुसावळ येथे गेली व त्या रात्री पीडित मुलीसह तिच्या दोन लहान बहिणी घरी झोपल्या होत्या. आरोपी किशोर काळे हा रात्री
१२ वाजेच्या सुमारास दारू पिऊन आला व त्याने पीडित मुलीला पाय दाबायला सांगितले. मुलगी पाय दाबत असतानाच, आरोपीने अचानक उठून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. तत्कालीन तपास अधिकारी पीएसआय के. एम. आतराम, पोलिस निरीक्षक प्रकाश आर. सावकार यांनी तपास करून आरोपीविरुध्द दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
सरकार पक्षातर्फे एकूण ११ साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडिता, पीडितेची बहीण व तिची आई यांची साक्ष व पुरावे महत्त्वाचे ठरले, तसेच इतर साक्षीपुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला शिक्षा दिली. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील राजेश आकोटकर यांनी न्यायालयात बाजू मांडली. पैरवी अधिकारी म्हणून एएसआय फझलुर रेहमान काझी व एएसआय श्रीकांत गावंडे यांनी सहकार्य केले.