सहाय्यक आयुक्त रूपाली संख्ये, इंजिनिअर हितेश जाधव एसीबीच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 06:07 PM2022-08-04T18:07:56+5:302022-08-04T18:08:46+5:30
Bribe Case :महानगरपालिका अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.
मंगेश कराळे
नालासोपारा : महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग समिती पेल्हारच्या सहाय्यक आयुक्त रूपाली संख्ये आणि अभियंता हितेश जाधव यांना गुरुवारी दुपारी पालघर लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे. यामुळे महानगरपालिका अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.
नालासोपारा येथे एका दुकानाच्या दुरुस्ती व उंची वाढविण्याचे काम घेतले होते. सदरचे बांधकामावर कारवाई करुन ते निष्काषित न करण्याकरीता पेल्हार सहाय्यक आयुक्त रूपाली संख्ये आणि अभियंता हितेश जाधव यांनी सदरील व्यक्तीकडे ५० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे याबाबत रीतसर तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार संख्ये यांनी तडजोडीत ४० हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केले होते. ही रक्कम कार्यालयात हजर असलेला गणेश झनकर यांच्याकडे देण्यास सांगितले होते.
कंत्राटी मजुर गणेश झनकर यांनी १८ जून ते २१ जून दरम्यान सापळा कारवाईत सदरील व्यक्तीकडून ४० हजार रुपये स्विकारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी गुरुवारी दुपारी पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर रुपाली संखे, कंत्राटी कनिष्ठ अभियंता हितेश जाधव आणि गणेश झनकर या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.