नारायणगाव येथे सहायक पोलीस निरीक्षकाला लाचप्रकरणी अटक; पाच लाख रुपयांची केली होती मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 11:39 AM2020-08-12T11:39:26+5:302020-08-12T11:40:18+5:30
सावकारीच्या गुन्ह्यात जामिनासाठी मागितले होते पाच लाख रुपये
पुणे/नारायणगाव : सावकारीच्या गुन्ह्यात जामीन देण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन केशव घोडे-पाटील (वय ३८, रा. नारायणगाव) आणि पोलीस नाईक धर्मात्मा कारभारी हांडे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या गुन्ह्यात दोषारोपपत्र लवकर दाखल करावे यासाठी सहायक पोलीस निरीक्षकाने पैसे मागितले.
येथील एका सावकाराने एकाला डांबून ठेवले होते. याप्रकरणी सावकाराला जामीन देण्यासाठी आणि इतर दोघांना आरोपी न करण्यासाठी घोडे-पाटील यांनी पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आली होती. त्याची ७ ऑगस्ट रोजी पडताळणी करण्यात आली. त्यावेळी घोडेपाटील याने हांडे याच्या मार्फत लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नारायणगाव येथे सापळा रचला होता. मात्र, या दोघांना संशय आल्याने ते लाच घेण्यासाठी फिरकले नाहीत. त्यानंतर पोलिसांनी दोन दिवस वाट पाहिली. मात्र, लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले असल्याने दोघांवरही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक सुनील बिले तपास करत आहेत.